नाशिक जिल्ह्यात तीन- चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

लसीकरणाची गती मंदावली
नाशिक जिल्ह्यात तीन- चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

नाशिक । Nashik

पंतप्रधान मोदी लस महोत्सव साजरे करा असे सांगत असले तरी देशभरात करोना लसीचा तुटवडा असून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत अव्वल असलेल्या नाशिकमध्येही लसीकरण प्रक्रिया थंडावली आहे.

जिल्ह्यासाठी सोमवारी ( दि.२६) केंद्राकडून ७८ हजार ७८० करोना लसीचे डोस प्राप्त झाले आहे. मात्र पुढिल तीन ते चार दिवस पुरेल इतकेच हे डोस असून जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

देशात करोनाचा कहर सुरु असून नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाची त्सुनामी आली आहे.

मुंबई व पुण्यापेक्षा अधिक रुग्ण नाशिकमध्ये पाॅझिटिव्ह सापडत असून देशात सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये नाशिक अग्रक्रमावर आहे. रुग्णांना बेड, आॅक्सिजन व रेमडिसिव्हर मिळेनासे झाले आहे. त्यात चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यात करोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

लसीकरण प्रक्रिया थंडावली होती. अनेक केंद्रावर मागील दोन दिवसांपासून लसीकरण बंद होते. केंद्रावर लसीकरण बंदचे फलक लावण्यात आले होते. सद्यस्थितीत करोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हेच प्रमुख अस्त्र आहे.

मात्र त्याचाच तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत आले होते. मात्र सोमवारी जिल्ह्याला ७६ हजार ७८० लसी प्राप्त झाल्या. जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग लक्षात घेता पुढिल तीन ते चार दिवस या लसी पुरणार आहेत.

मात्र पुन्हा वेळेवर लसी प्राप्त न झाल्यास लसीकरणावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान जिल्ह्यात ५ लाख २० हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ८४ हजार ७२० हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com