परिमंडळ एकमधून ७४ सराईत तडीपार

शहर पोलीसांची धडक कारवाई
परिमंडळ एकमधून ७४ सराईत तडीपार

नाशिक | Nashik

शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहर पोलीसांनी धडक मोहिम सुरू केली असून चालू वर्षी दहा महिन्यात परिमंडळ एकमधील तब्बल ७४ सराईतांना तडीपार करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.२३) एकाच दिवशी पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी 5 जणांना तडीपार केले आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी असे तडीपारीचे अस्त्र उगारले आहे. टोळ्या तसेच सराईतांसह यंदा प्रथमच पोलिसांनी जुगार खेळणार्‍यांना सुद्धा तडीपार केले आहे.

परिमंडळ एकमध्ये ७४ पैकी ६ वेगवेगळ्या टोळ्यांमधील २४ जणांना शहराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वैयक्तीक प्रकरणात ४८ जणांना तर, शिक्षा भोगून आलेल्या आणि पुन्हा गुन्हेगारी कारवाई केलेल्या दोघा सराईताचा समावेश आहे. या वर्षात हा आकडा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

परिमंडळातील गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली, म्हसरूळ आणि आडगाव या पोलिस ठाण्यांच्या भौगौलिक व सामाजिक परिस्थितीनुसार गुन्हे घडत असतात. त्यातील सातत्याने गुन्हे करणार्‍यांवर लागलीच तडीपारीची कारवाई करण्यात येते.

काही तडीपार तडीपारीच्या काळात शहरात येतात. मात्र माहिती मिळाल्यानंतर त्यांना लागलीच अटक देखील होते. अशा गुन्हेगारांना मुदत संपेपर्यंत उजळ माथ्याने फिरता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेसाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com