निफाड नगरपंचायतीसाठी 73.64 टक्के मतदान

14 प्रभागातील 14030 पैकी 10332 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
निफाड नगरपंचायतीसाठी 73.64 टक्के मतदान

निफाड। प्रतिनिधी Niphad

निफाड नगरपंचायतीच्या Niphad Nagar Panchayat Election 14 प्रभागातील मतदान Voting प्रक्रिया आज शांततेत पार पडली. येथे पुरुष 7091, महिला 6938 व इतर 1 अशा 14030 मतदारांपैकी 5298 पुरुष, 5034 महिला असे एकुण 10332 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 73.64 टक्के मतदानाची नोंद झाली असून 43 उमेद्वारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

या निवडणुकीत विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, बसपा व काही अपक्षांनी देखील नशिब अजमाविल्याने येथे सर्वच पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परिणामी उर्वरित 3 प्रभागासाठी 18 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर सर्व प्रभागासाठी 19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात थंडीचा माहोल वाढल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत अवघे 800 मतदारांनी मतदान केले होते. तर त्यानंतर सकाळी 11.30 वाजेपर्यंत 2651 मतदार म्हणजेच अवघे 18.90 टक्के मतदान झाले. मात्र त्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागल्याने दुपारी 1.30 वाजेपर्यंत 4771 मतदारांनी मतदान केले. दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी वाढू लागल्याने काहिसे निवडणुकमय वातावरण तयार झाले होते.

मात्र निफाड शहरात होणारे मतदान पाहता दुपारपर्यंत मतदारांमध्ये काहिसा निरूत्साह दिसून आला. दुपारी 3 वाजेनंतर मात्र प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले.

येथे प्रभाग 1 मध्ये 1300 पैकी 924 मतदारांनी मतदान केल्याने येथे 71.7 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर प्रभाग 2 मध्ये 1107 पैकी 893 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे 80.66 टक्के मतदान झाले आहे. प्रभाग 4 मध्ये 1492 पैकी 1007 मतदान झाले.

साहजिकच येथे मतदानाची टक्केवारी 67.49 टक्के राहिली. प्रभाग 5 मध्ये 1055 मतदारांपैकी 734 मतदारांनी मतदान केल्याने येथे 69.57 टक्के मतदान झाले. प्रभाग 6 मध्ये 750 पैकी 530 म्हणजेच 70.66 टक्के मतदान झाले.

प्रभाग 7 मध्ये 907 पैकी 536 मतदान झाले. परिणामी येथे 59.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्रभाग 8 मध्ये 851 पैकी 608 मतदान झाल्याने येथे 71.44 टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभाग 9 मध्ये 728 पैकी 611 म्हणजेच येथे 83.82 टक्के मतदान झाले.

प्रभाग 11 मध्ये 1042 पैकी 815 मतदारांनी मतदान केल्याने येथे 78.21 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्रभाग 12 मध्ये 1019 मतदारांपैकी 796 मतदान झाल्याने येथे 78 टक्के मतदानांची नोंद झाली आहे.

प्रभाग 14 मध्ये 986 पैकी 806 मतदान झाल्याने येथे मतदानाची टक्केवारी 81.74 राहिली. प्रभाग 15 मध्ये 963 पैकी 746 मतदान झाले. येथे 77.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

प्रभाग 16 मध्ये 894 पैकी 739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे 82.66 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्रभाग 17 मध्ये 830 पैकी 536 मतदारांनी मतदान केले. येथे 59.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

येथील प्रभाग क्र.3,10,13 हे ओबीसी आरक्षित प्रभाग आता सर्वसाधारण झाल्याने या प्रभागासाठी देखील 18 जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान मतदानानंतर येथे सर्वच उमेद्वारांनी विजयाचा दावा वर्तविला आहे. त्यामुळे अंतिम क्षणी झालेले मतदान कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार याचीही आकडेमोड करण्यात कार्यकर्ते व नेते व्यस्त झाले आहे.

एकुणच या सर्व उमेद्वारांच्या विजयाचा फैसला 19 जानेवारी रोजी होणार्‍या मतमोजणीत स्पष्ट होणार असले तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच येथे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, बसपा, विकास आघाडी यासह काही अपक्षही इतर पक्षांच्या मदतीने रणांगणात उतरले होते.

अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या येथील लढतीत अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीत आर्थिक देवाण-घेवाण देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने दुपारनंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. मात्र असे असले तरी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत येथे मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या प्रभागात मतदान कमी झाले त्याचा फटका कुणाला तसेच जेथे मतदान जास्त झाले त्याचा लाभ कुणाला होणार याची आकडेमोड उमेद्वार, नेते, कार्यकर्ते आपआपल्या परीने करीत आहे.

Related Stories

No stories found.