Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar|MLA Manikrao Kokate
नाशिक

पूर कालव्यासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या तालुक्यातील खोपडी-मिरगाव पूर कालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना दिले.त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही आज मंजुरी देण्यात आली.

आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील अवर्षणग्रस्त भागासाठी हरित संजीवनी देण्याच्या उद्देशाने कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव या दोन पूरकालव्यांना प्रशासकीय मंजुरी मिळवली. त्याचे भूमिपूजनही झाले.मात्र सत्तांतर झाल्यानंतर कुंदेवाडी ते सायाळे या पूरकालव्याचे काम सुरु झाले.

खोपडी ते मिरगाव या पूरकालव्याचे काम सुरु होऊ शकले नव्हते. पाच वर्षात ठप्प झालेलं काम पुन्हा सुरु होण्यासाठी आमदार कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या दालनात जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांच्यासह मिटिंग बोलावण्याची विनंती केली.

त्यावर आज गुरुवारी( दि. २०) दुपारी पवार यांच्या दालनात जलसंधारण मंत्री गडाख ,जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त विभागाचे सचिव राजू मित्तल, जलसंधारण विभागाचे सचिव नंदकुमार, औरंगाबाद जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता विश्वनाथन यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी जलसंधारण विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांना आमदार कोकाटे यांनी सुचविल्याप्रमाणे खोपडी ते मिरगाव या पूरकालव्याचे बंदिस्त पाईप कालव्यात रूपांतर करून त्याचे सुधारित अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले होते.

यावेळी सुमारे ३६ कोटीची ही योजना ७२ कोटींहून अधिक रुपयांना जाईल असे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगताच सुधारित आर्थिक खर्चास ना. पवार यांनी तात्काळ मंजुरी दिली.

कोकाटे यांच्या सारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना जलसंधारण व अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना देत तात्काळ कार्यवाहीच्या सूचनाही केल्या. त्यासाठी निधीचे चार टप्पे करत दरवेळी २५ टक्के निधी देण्याचे सूत्र ठरविण्यात आले.

यावेळी आमदार कोकाटे यांनी स्थगिती देण्यात आलेल्या हिवरे व चोंढी येथील कोटा बंधाऱ्यांचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्याची विनंती केली असता, या कामांचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

वडगाव सिन्नर ते मनेगाव व डूबेरे ते गोंदे या मंजूर असलेल्या पुरचाऱ्याही तात्काळ बंदिस्त पाईपलाईन पद्धतीने सुरू करण्याची मागणी कोकाटे यांनी केली होती. हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश यावेळी पवार यांनी दिले. हे पाणी सेकंड क्लास बंधाऱ्यात सोडले जाणार आहे.

'ना नफा, ना तोटा' तत्वावर टाकेद गटातील उपसा सिंचन योजना सुरु होणार..

१० वर्षांपासून टाकेद गटात आदिवासी भागात मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजना सुरु होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, या भागाची आदिवासी लोकसंख्या ९० टक्के नसल्याने अडथळे येत असल्याचा मुद्दा आमदार कोकाटे यांनी मांडून बाळ भैरवनाथ सारख्या उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली.त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष बाब म्हणून आदिवासी लोकसंख्येची अट शिथिल करत ना नफा ना तोटा तत्वावर टाकेद गटातील उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी दिली. त्यामुळे टाकेद गटातील उपसा जलसिंचन योजनाही लवकरच सुरु होणार आहेत. शिवाय हा भाग आदिवासी असल्याने केंद्र सरकारकडून आदिवासी भागासाठी मिळणारा निधी अंतर्गतही जास्तीत जास्त कामे या भागात मंजूर होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

२६ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार ...

या बैठकीत सुधारित योजनेस मंजुरी मिळाल्याने पूर्व भागातील अवर्षणाचा सामना करणाऱ्या २६ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून पूर कालवे व सिंचनाच्या इतर समस्याही मार्गी लावण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे सिन्नर मतदारसंघातील सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

आमदार माणिकराव कोकाटे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com