सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध
नाशिक

सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध

७ लाख ९८ हजार दाखल्यांचे वाटप

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा प्रशासनाने डिजिटलायजेशनकडे वाटचाल केली असून त्यामुळे शैक्षणिक दाखल्यांपासून अगदी सातबारे वितरण पद्धत अतिशय सुलभ झाली आहे.वर्षभरात ७ लाख ९८ हजार विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यात जातीच्या दाखल्यापासून ते वय, उत्पन्न, डोमेसाईलसह अनेक महत्त्वाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

नागरिकांना जातीच्या दाखल्यापासून ते वय, उत्पन्न, डोमेसाईलसह अनेक महत्त्वाचे दाखले, प्रमाणपत्रे, नोकरी, शैक्षणिक अथवा इतर कारणांसाठी लागत असतात. शेतकर्‍यांना वेळोवेळी सातबार्‍याची गरज असते. हे सर्व लक्षात घेता जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील जुन्या अभिलेखातील कागदपत्रांचे संगणकीकृत स्कॅनिंग करून त्याचे जतन करण्यात आले आहे.

यात विशेष करून जमिनीचे एकूण १२ लाख ४६ हजार ८८५ सातबारा उतार्‍यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. शिवाय हे सर्व उतारे डिजिटल स्वाक्षरीसह नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे इंटरनेटद्वारे कुठेही आपला सातबारा प्रत्येकाला बघावयास उपलब्ध झाला आहे. गत चार ते पाच वषार्र्ंपासून सातबारा ऑनलाईन उपलब्ध करण्याच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. पण अत्यंत जिकिरीचे असलेल्या या कामाची पूर्ती ही गत महसुली वर्षात करण्यात यंत्रणेला यश आले.

नाशिक शहरातील काही देवस्थाने, इमानी जमिनी सोडल्यास तसेच जिल्ह्यातीलही काही देवस्थानांच्या जमिनी सोडल्यास इतर जवळपास सर्वच जमिनींचे सातबारा उतारे हे ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे त्यावर त्या-त्या जबाबदार अधिकार्‍यांची डिजिटल स्वाक्षरीही झाल्याने शेतकर्‍यांना आपला सातबारा ऑनलाईनच उपलब्ध झाला आहे.

१५ रुपये शुल्क तेही ऑनलाईन भरल्यानंतर लागलीच हा उतारा कुणालाही उपलब्ध होतो. त्यामुळे तलाठी तात्याची वाट पाहण्यापासून नागरिकांची, शेतकर्‍यांची सुटका झाली आहे. दरम्यान, शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा महाराजस्व अभियानाअंतर्गत वर्षभरात नागरिकांना, शेतकर्‍यांना त्यांच्या गावी जाऊन विविध शिबिरांद्वारे सातबाराच्या नोंदी दुरूस्त करणे, प्रलंबित फेरफार निर्गती करणे, सातबारा वाटप करणे, अतिक्रमण झालेले पाणंद रस्ते मोकळे करून देण्यात आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com