करोनाला अटकाव करण्यासाठी ७० टक्के लसीकरण गरजेचे !

: मनपा आयुक्त कैलास जाधव
करोनाला अटकाव करण्यासाठी ७० टक्के लसीकरण गरजेचे !

नाशिक । फारूक पठाण

नाशिककरांनी आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तो वाखणण्याजोगा असून यापुढेही अजून काही महिने संयमानेच राहावे लागेल.

सद्यस्थितीत लसीकरण हे दहा ते पंधरा टक्के झाले असून 70 टक्क्यांचा पल्ला गाठल्यानंतर कुठेतरी सुरक्षितता दिसू लागेल, असे म्हणणे योग्य होईल, असे मत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केले.

शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे व्हायला पाहिजे. नागरिकांनी यापुढेही किमान वर्षभर तरी वाढदिवस अथवा कोणत्याही सार्वजनिक समारंभानिमित्त गर्दी करण्याचे टाळावे, असे स्पष्ट मत आयुक्तांनी व्यक्त केले.

देश व राज्यासह शहरावर करोनाचे महाभयंकर संकट घोंगावत असून 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण धोका टळल्याचे मानू शकत नाही, असे जाधव म्हणाले. मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसला तरी उपलब्ध होणार्‍या लसींचे वितरण सुरळीत सुरू आहे.

सध्या 10 ते 15 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नागरिकांनी धोका संपल्याच्या संभ्रमात न वावरता करोना नियमांचे पालन करावे, असे प्रतिपादन आयुक्तांनी केले. सध्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दोन हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (गृहविलगीकरण) आहेत.

हे विलगीकरण व सामाजिक अंतर नीट न पाळल्यास समाजात धोका तसाच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व रुग्ण व नागरिकांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. करोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक तर दुसर्‍या लाटेत तरुणवर्ग विळख्यात सापडला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसर्‍या लाटेचे संकेत मिळाले असून यात लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे.

या कालावधीत पालकांना लहान मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्याबाबतीत नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात वाढदिवस किंवा कार्यक्रम करणे टाळावे. सुरुवातीला थंडीत हा आजार वाढेल असे दावे केले जात होते. प्रत्यक्षात तो उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात वाढला. जगभरातील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हा अंदाज बांधला आहे. त्यावर विश्वास ठेऊन अजून काहीकाळ बालकांना घरातच ठेवणे गरजेचे आहे.

नाशिकमध्ये आतापर्यंत सुमारे तीन लाख लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून सुमारे दीड लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. साधारण 14 लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये 70 टक्के नागरिकांनी तरी लस घेतली पाहिजे.

तेव्हा कुठे हा धोका टळू शकेल. अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे मी आवाहन करतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com