नाशिक । Nashik

रेशनकार्डला आधार नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आली असून ७ हजार ३७९ रेशनधारकांनी अद्याप आधार नंबर लिंक केला नाही. त्यामुळे या रेशनधारकांना मार्च महिन्याचे अन्नधान्यापासून वंचित रहावे लागणार आहे. आधार लिंक करण्ताची अंतिम मुदत १५ फेब्रुवारीला संपुष्टार आली असून शासनाने मुदतवाढ नाकारली आहे.

रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राहकाचे रेशन कार्ड आधार नंबरला जोडणे बंधनकारक केले होते. वारंवार होणारे रेशन घोटाळे तसेच पात्र नसलेल्या ग्राहकांची नावे यादीत समाविष्ट करत त्यांच्या नावाने उकळले जाणारे रेशन आणि यातून होणारी शासनाची फसवणूक हे सारं बंद करण्यासाठी शासनाने रेशन वितरण प्रणाली मध्ये मोठे बदल केले आहेत.

बायोमेट्रिक प्रणालीसह धान्याचे वितरण तसेच प्रत्येक रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे, रेशन कार्डला नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. यातून पात्र आणि खरोखर गरज असलेलेच लाभार्थी समोर येतील.

त्यामुळे आपोआपच इतरांची नावे कमी होतील. अन साहजिकच त्यांचे धान्यही वाचेल.हे धान्य इतर गरजू नवीन लाभार्थ्यांना देणे शक्य होईल. अशी शासनाची धारणा आहे.

त्यामुळे शासनाने प्रत्येकाचे आधार कार्ड रेशन प्रणालीला लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यास जानेवारी अखेरची दिलेली मुदतही वाढवून १५ फेब्रुवारी केली होती. आता ही वाढीव मुदत देखील संपली आहे.जिल्ह्यात आतापर्यन्त ७ लाख ५६ हजार ९८३ रेशन कार्ड धारकांपैकी ७ लाख ४९ हजार ६०४ कार्ड धारकांनी आधार लिंक केले आहे.

अजून ७ हजार ३७९ कार्डधारकांचे आधार लिंकींग राहिले आहे. त्यामुळे ज्यांचे आधार जोडले असेल त्याच लाभार्थ्यांना धान्य मिळेल.इतरांना धान्य मिळणार नाही.त्यांनी धान्य घेण्यासाठी आपल्या घराजवळील स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपले आधार तत्काळ लिंक करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर यांनी केले आहे.