पाऊस
पाऊस
नाशिक

जुलैत सरासरीच्या ६७ टक्के पाऊस

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाचा लहरीपणा यंदा पहायला मिळत असून ऐरवी त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या पश्चिम पट्ट्यात धुवांधार बरसणार्‍या पावसाने या ठिकाणी सरासरी देखील गाठली नाही. तर दुष्काळी ओळखल्या जाणार्‍या बागलाण, नांदगाव, मालेगाव, चांदवड व देवळा तालुक्यात पावसाने सरासरीपेक्षा जादा हजेरी लावली आहे.

जिल्ह्याचा विचार करता जुलैच्या एकूण सरासरीपैकी यंदाच्या हंगामात केवळ ६७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

पावसाचे जून व जुलै हे दोन महिने सरले आहे. या दोन्ही महिन्यात जिल्ह्यात पावसाने त्याची सरासरी देखील गाठली नाही. अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरण्या धोक्यात आल्या असून शेतकरी संकटात सापडला आहे.

पश्चिम किनारपट्टीच्या जवळ असलेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील इतर विशेषत: पूर्व भागात दरवर्षी धुवांधार पाऊस पडतो. येथील दमदार पावसामुळे नाशिक शहर व मुंबईची तहान भागवली जाते.

मात्र यंदा या तालुक्यांमध्ये दरवर्षीच्या तुलनेत जेमतेम पाऊस पडला आहे. हे तालुके भात पिकासाठी ओळखले जातात. मात्र पावसा अभावी भाताची आवणी देखील धोक्यात आली आहे. तर दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा या ठिकाणी दरवर्षीच्या सरासरी पेक्षा जादा बरसत वरुण राजाने कृपा केली.

पावसाच्या हंगामाचे दोन महिने संपले असून आता ऑगस्ट व सप्टेंबरकडून दमदार पावसाची अपेक्षा आहे. पुढील काळात पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित आहे. तरच पिकांना संजीवनी मिळणार मिळेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

Deshdoot
www.deshdoot.com