इंदिरा गांधी रुग्णालयात दुपारपर्यंत ६०० नागरिकांना दिली लस

इंदिरा गांधी रुग्णालयात दुपारपर्यंत ६०० नागरिकांना दिली लस

पंचवटी | वार्ताहर

महाराष्ट्र दिनापासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा पुरवठा झाला नसल्याने पहिल्याच दिवसापासून या मोहिमेला ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे...

पंचवटी कारंजा वरील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू झाले असून आज (दि.४) दुपारपर्यंत जवळपास ६०० नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती पंचवटी विभागीय नोडल अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली.

केंद्र सरकारने दि.१ मे पासून १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शनिवारी (दि.१) राज्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला.

परंतु या लसीकरण मोहिमेला लसींचा मुबलक प्रमाणात साठा नसल्याने ब्रेक लागला असल्याचे चित्र आहे. नाशिक मनपा प्रशासनाने पंचवटी कारंजा वरील इंदिरा गांधी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

शनिवारी (दि.१) पहिल्याच दिवशी याठिकाणी नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने, काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर लसीकरण सुरू होऊन पहिल्या दिवशी ९० जणांचे लसीकरण करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी देखील ९० नागरिकांना लस देण्यात आली असून, तिसऱ्या दिवशी १९४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर मंगळवारी (दि.४) चौथ्या दिवशी याठिकाणी दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे २१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.

म्हणजेच चार दिवसात १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ६०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. देवकर यांनी दिली.

दुसरीकडे पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालयातील मनपाचे लसीकरण केंद्र यासह नांदूर, हिरावाडी, म्हसरूळ, मखमलाबाद, मायको दवाखाना, तपोवन येथील लसीकरण केंद्र ४५ व त्यावरील वयाच्या नागरिकांसाठी लस उपलब्ध नसल्याने बंद करण्यात आलेले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नाहक चकरा माराव्या लागत असल्याने, सर्वत्र संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. मनपा प्रशासनाकडून लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर साधारणतः गुरुवार (दि.६) पासून पंचवटी विभागातील सर्वच आठही लसीकरण केंद्रे सुरू होणार असल्याचे यावेळी डॉ.विजय देवकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com