नाशिक । संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता जिल्ह्यातील सहकारी चळवळ ढवळून निघणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने बुधवारी (दि.१०) पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ५८ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिली.

राज्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सहकार विभागाने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील १८८२ सहकारी संस्थांची मुदत संपत आल्याने मागील वर्षी मार्च महिन्यात या संस्थांची निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू होती. मात्र, करोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च अखेरीस या संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सरकारने दाेन फेब्रुवारीस या सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेल्या टप्प्यापासून पुन्हा सुरू करण्याचे दिले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह १८८२ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी (दि.१०) पहिल्या टप्प्यात राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दि.१५ पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५८ संस्थांचा समावेश आहे. यात विविध कार्यकारी सहकारी संस्था (४८), सेंट्रल गोदावरी कृषक संस्था, ग्रामोद्योग संघ व पगारदार पतसंस्था(८) यांचा समावेश आहे. हा पहिल्या टप्पा असून इतर टप्प्यात मुदत संपलेल्या इतर संस्थांची निवडणूक प्रक्रिया टप्याटप्याने सुरू होणार आहे.

या आहेत जिल्ह्यातील ५८ संस्था

दिंडोरी तालुका : चिंचखेड, दिंडोरी आदिवासी विकास संस्था, आंबेदिंडोरी, जऊळके वणी, दहेगाव, मावडी, राजापूर, पिंप्री अंचला,चौसाळे आदिवासी विकास संस्था, खेडले विकास संस्था.

निफाड तालुका : चितेगाव, निफाड ग्रामोद्योग संघ, विवेकानंद संस्था चापडगाव, नारायण टेंभी, शिवरे, गुंजाळवाडी, बाणेश्वर विकास संस्था कोठुरे, बाणगंगा विकास संस्था, रेणुकामाता संस्था निमगाव, भैरवनाथ संस्था चाटोरी, वऱ्हेगाव, शिवरे, गोंदेगाव विकास संस्था.

येवला तालुका : बाभुळगाव, सायगाव, न्याहारखेडे, श्रीराम संस्था तांदूळवाडी. येवला, धामणगाव, चांदगाव, अंगणगाव, खिर्डीसाठे विकास संस्था

नांदगाव : अस्तगाव, लोहशिंगवे, कोंढार,धनेरभाडा, अण्णासाहेब कवडे संस्था बाणगाव, अण्णासाहेब कवडे संस्था टाकळी. विजयमामा आहेर विकास संस्था न्यायडोंगरी

मालेगाव तालुका :चिखलओहोळ, शेरूळ, भिलकोट, झोडगे, दसाणे.

सिन्नर तालुका : सोमठाणे, सांगवी विकास संस्था.

नाशिक तालुका : गोदावरी संस्था माडसांगवी, देवळाली गाव-बेलतगव्हाण, नाशिकरोड-देवळाली सिन्नरफाटा, सेंट्रल गोदावरी कृषक संस्था,गंगापूर .. पगारदार संस्था गोखले शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था, विद्युत तांत्रिक कामगार पतसंस्था(चांदवड) सीएट कर्मचारी पतसंस्था, हिंदुस्थान लिव्हर कर्मचारी, सानेगुरुजी प्राथिमक शिक्षक पतसंस्था, महाराष्ट्र वीज कामगार संघ पतसंस्था, डॉ. मुंजे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संस्था कर्मचारी पतसंस्था,विद्युत तांत्रिक कामगार पतसंस्था(नाशिकरोड ) ..