समितीच्या बैठकी अभावी 500 कामे रखडली

जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कामकाजावर सदस्य नाराज
समितीच्या बैठकी अभावी 500 कामे रखडली

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या निविदांवर सदस्यांचे आक्षेप असताना निविदा उघडण्यात येतात. दुसरीकडे मात्र कामवाटप समितीची बैठक घ्यायला वेळ नसल्याचं चित्र आहे. कामवाटप समितीची बैठक न झाल्याने पावसाळ्यापूर्वीचे सुमारे 500 कामे रखडली आहेत. बांधकाम विभाग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोयीच्या कामांमध्ये रस असल्याचा आरोप माजी बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम असो की लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व कामांना 31 मार्चपूर्वी प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत.या कामांचा निधी देखील उपलब्ध आहे.मात्र,केवळ बांधकाम विभागांतर्गत काम वाटप समितीची बैठक न झाल्याने या कामांचे वाटप होऊ शकलेले नाही.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक होत असते. मात्र, 22 मार्चनंतर अद्यापही या बैठकीला मुहूर्त लागलेला नाही.

सदर कामवाटप समितीची बैठक न झाल्याने शाळा, बंधारे, रस्ते दुरुस्त्या कामास सुरुवात होऊ शकलेली नाही. ही कामे पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. ही बैठक घेण्याला वेळ नसताना दुसरीकडे मात्र निविदा उघडण्याची घाई बांधकाम विभागाकडून सुरू आहे. प्रसिद्ध झालेल्या अनेक निविदांवर पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी आक्षेप घेत हरकती नोंदवल्या आहेत.

मात्र,त्याकडे दुर्लक्ष करत या निविदा उघडण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हरकतींवर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु , त्यांच्याकडूनच सोयीचे कामे केली जात असल्याची तक्रार माजी सभापती मनिषा पवार यांनी केली आहे. बांधकाम विभाग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चुकीच्या कामकाजाचा विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे मनिषा पवार यांनी सांगितले.

बांधकामचा अजब कारभार

बांधकाम विभागांतर्गत 2515 लेखाशिर्षकाखाली कामांना 55 टक्के निधी उपलब्ध झाला आहे. मात्र , यात अनेक दुबार कामे असून त्यांना निधी प्राप्त झाला आहे. बांधकाम विभागाकडून ठराविक ठेकेदारांचे दुबार प्रस्ताव गेल्याचे बोलले जात आहे. या दुबार कामांमुळे झालेल्या कामांचे पैसे वाटप करण्यास अडथळा येत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com