नाशिक । Nashik

महिला अत्याचारांबाबच्या गुन्ह्यांसाठी 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबवून शहरातील 500 गुन्ह्यांची निर्गती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी येथे दिली. या प्रसंगी ही कामगिरी पार पाडणार्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे बक्षिस व प्रशस्तीपत्र देऊन आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगीतले, डिसेंबर महिन्याच्या कालावधीत गुन्हे, अर्ज, अकस्मात मृत्यू व मुद्देमाल निर्गती संबंधाने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 504 गुन्हे, 233 अकस्मात मृत्यू तपास, 1 हजार 72 तक्रार अर्ज आणि 266 प्रलंबित मुद्देमाल निर्गती करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एक हजार तक्रारी आल्या होत्या. तर डिसेंबरमध्ये 504 तक्रारी पोलिसांकडे आल्या असून, त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्र अंतर्गत पोलीस ठाणेकडील महिला अत्याचारासंदर्भात दाखल असलेले गुन्हे आणि 18 वयोगटापुढील हरवलेल्या मुली व महिलांसंदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली.

विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी 74 गुन्ह्यांची पोलिसांकडून निर्गती करण्यात येवून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील 29 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हरवलेल्या मुली व महिलांपैकी 70 जणींचा शोध घेवून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, पोलीस निरीक्षक इरफान शेख, अशोक भगत आदी उपस्थित होते.