१९ रेस्क्यू बोटसह ५० स्वयंसेवक पूर परिस्थिती नियंत्रणासाठी सज्ज

मान्सून पूर्व तयारी पूर्ण : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट
१९ रेस्क्यू बोटसह ५० स्वयंसेवक पूर परिस्थिती नियंत्रणासाठी सज्ज

नाशिक । Nashik

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून पूर परिस्थिती व मदत कार्यासाठी १९ रेस्क्यू बोटसह पाण्यात पोहणारे ५० जिवरक्षकांची टीम मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण व हेल्पलाईन कक्ष येत्या १ जूनपासून कार्यन्वित केला जाणार आहे. पूर परिस्थितीत जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हवामान खात्याने १ जूनला वाचक केरळ किनारपट्टीवर मान्सून बरसणार व देशभरात यंदा शंभर टक्के पाऊस पडेल असे भाकित वर्तवले आहे. मागील दोन वर्षापासून नाशिक जिल्ह्यात मान्सून हंगामात दमदार पाऊस झाला आहे. सन २०१९ मध्ये तर गोदावरी व तिच्या उपनद्यांना महापूर आला होता.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दमदार पाऊस झाला तर अनेक धरणांतून विसर्गामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते बघता जिल्हाप्रशासनाने पूर परिस्थिती व बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून यंत्रणा कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. पूर परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोटस् महत्वपूर्ण ठरते.

सद्यस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १९ बोटस् सज्ज आहेत. तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ९ रबर बोटीची मागणी करण्यात आली आहे. पूराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. तसेच घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तू वाहून जातात. ते बघता ५० स्वयंसेवक व पाण्यात पोहणार्‍या जीवरक्षकांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. जेणेकरुन नागरिकांना पूरपरिस्थितिची पूर्व कल्पना देता येऊन मदत कार्य राबविणे शक्य होईल.

पूर परिस्थितीत लोकांचे जीव वाचवणे, त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे व पूर ओसरल्यानंतर दळणवळण आणी मदत कार्य राबविण्यासाठी एनडीआरएफ, एसडिआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथकाची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिका, जिल्हापरिषद येथील नियंत्रण कक्षात इंटरनेट, प्रिंटर, टिव्ही, व्हिडिओ काॅन्फरन्स यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिल्या आहेत.

यंत्रणा सज्ज

- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन - २ रबर बोट

- नाशिक मनपाकडे - ३ बोट

- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १० रेस्क्यू बोटस्

- सोमेश्वर बोट क्लब - २ बोट

- केटिएचएम बोटक्लब - २ बोट

- २० गिर्यारोहकाचे पथक

- ६४ ठिकाणी माॅकड्रिल

- जिल्हा नियंत्रण कक्ष - ०२५३ - २३१७१५१

मान्सूनच्या तोंडावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोटस्,मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडिआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथके सज्ज आहेत. येत्या १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण व हेल्पलाईन कक्ष कार्यन्वित केला जाईल.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Related Stories

No stories found.