इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

मॉसडोरफर कंपनी प्रकरण : १७ कामगारांसह ५ वाहन चालक पुन्हा कामावर

आमदार हिरामण खोसकर यांची मध्यस्थी यशस्वी

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

गोंदे दुमाला येथील मॉसडोरफर कंपनीने (Mossdorfer company) १७ कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरुन काढुन टाकल्याने त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या दोन आठवड्यापासुन भरपावसात कंपनी गेटवर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र कंपनी व्यवस्थापन या कामगारांना कामावर घेण्यास तयार नसल्याने वाद चिघळत चालला होता.

अखेर आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी पुढाकार घेत इगतपुरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, कंपनी व्यवस्थापन, सीटुचे कामगार नेते देवीदास आडोळे व कामगार यांच्यात बैठक घेण्यात आली. शुक्रवार दि. १७ रोजी संध्याकाळी चार वाजता सुरू झालेली बैठक रात्री आठ वाजेपर्यंत चालली. मात्र चार तास चाललेल्या या बैठकीत कुठलाच तोडगा निघत नसल्याचे पाहुन अखेर आमदार खोसकर यांनी कंपनी विरोधात कठोर भुमिका घेतल्याने कंपनी व्यवस्थापन नरमले. कंपनीने १७ कामगार व ५ वाहन चालकांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देण्याचे कबुल केले. मात्र रात्री ऊशीर झाल्यामुळे शनिवारी सायंकाळी कंपनी गेटवर कामगारांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती कॉ. देवीदास आडोळे यांनी दिली.

मागील दोन आठवड्यापासुन या कामगारांना कामावर घेण्यात या मागणीसाठी सीटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी भरपावसात कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरु होते. यावेळी आमदार खोसकर यांनी कंपनी व्यवस्थापने बरोबर चर्चा केल्याने व्यवस्थापनेने कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र कंपनीने दिलेला आपला शब्द न पाळल्याने हा वाद विकोपाला गेला होता. अखेर इगतपुरी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार खोसकर यांनी घेतलेल्या कठोर भुमिकेमुळे कंपनीने कामगारांना कामावर घेतल्याने कंपनी पुर्ववत सुरु करण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमीनी कंपन्यांसाठी दिल्याने येथील शेतकरी भुमिहीन झाला आहे. म्हणुन तालुक्यातील सर्वच कंपन्यांनी स्थानिक युवकांना रोजगाराची संधी देणे बंधनकारक आहे. यापुढे तालुक्यातील कोणत्याही कंपनीने कामगारांवर अन्याय होईल असे वागु नये अन्यथा त्यांच्या विरोधात कठोर भुमिका घेण्यात येईल.

-- हिरामण खोसकर, आमदार

आमदार हिरामण खोसकर कामगारांच्या मदतीला धावुन आल्याने मॉसडोरफर कंपनीने काढुन टाकलेल्या कामगारांना परत कामावर घेेेतले. म्हणुन कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.

-कॉ. देवीदास आडोळे, सिटु कामगार नेते.

Deshdoot
www.deshdoot.com