
नाशिक | प्रतिनिधी
समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून नाशिक विभागातील ११०० दांपत्याना ५ कोटी ७९ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. तो शासकीय आहेर बँक खात्यात जमा हाणार आहे.
या योजनेसाठी केंद्र हिस्सा ५०% व राज्य हिस्सा ५०% या प्रमाणात निधी शासनाकडून दिला जातो. या योजनेंतर्गत प्रती दाम्पत्यांना रुपये ५०,०००/- अर्थसहाय्य पती-पत्नी यांचे संयुक्त नांवाने देण्यात येते. ही योजना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक असते.
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना या योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जुन २०२३ मध्ये रु.२७ कोटी ३१ लाख ७६ हजार इतका निधी शासनाने मंजूर केला आहे. सदरचा निधी क्षेत्रिय कार्यालयांना खर्च करणेसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात नाशिक- विभाग ५ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मंजुर झाले आहे.