कांद्याला मातीमोल भाव; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

कांद्याला मातीमोल भाव; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

भऊर | वार्ताहर Bhaur

कांद्याला कमी भाव मिळत (Onion price) असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion producer farmers) हवालदिल झाले आहेत. साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उसनवारीने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या खुंटेवाडी (Khuntewadi) (ता.देवळा) येथील महेंद्र सुरेश भामरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे....

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील खुंटेवाडी (Khuntewadi, Tal Deola) येथील महेंद्र सुरेश भामरे उर्फ गोटू या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केल्याने त्याचा रविवार (ता.१) रोजी मृत्यू झाला.

त्यामुळे शेतकरी वर्गात व्यवस्थेविरुद्ध संतापाची लाट उसळली असून या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची मदत मिळावी अशी मागणी होत आहे. कष्ट केलेल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसेल तर मग शेतकऱ्याने कसे जगावे असा प्रश्न विचारला जात आहे.

महेंद्रने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा (Onion) शुक्रवार (ता.२९) रोजी बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु या चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ आठ रु.प्रतिकिलो भाव मिळाला. ३० क्विंटल ट्रॅक्टरभर कांद्याचे केवळ २४ हजार रु.झाले.

त्यात ट्रॅक्टरभाडे, मजुरी व इतर खर्च यामुळे हातात प्रत्यक्ष कमीच रक्कम राहिली. यामुळे घरबांधणीसाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची, घरखर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने चिडचिड होत महेंद्रने त्याच दिवशी घरात असलेली कीटकनाशके पिऊन घेतली.

हे लक्षात येताच तातडीने त्यास देवळा ग्रामीण रुग्णालय (Deola Rural Hospital) मग मालेगाव आणि नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात (malegaon and dhule district hospital) उपचार चालू केले. पण त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रविवार (ता.१) रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चयात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

"महेंद्र हा अत्यंत कष्टाळू युवा शेतकरी होता. मोठ्या कष्टाने छोटेसे घर बांधत त्याने संसार उभा केला. या कुटुंबाला मदत मिळण्याची गरज आहे.

भाऊसाहेब पगार, माजी सरपंच खुंटेवाडी, ता.देवळा

"अवकाळी पाऊस, करपा रोगाचा प्रादुर्भाव, खंडीत वीजपुरवठा, अंतिम टप्प्यात पाण्याचा तुटवडा यामुळे कांद्याच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट झालेली आहे. आणि त्यात ७०० ते १००० रु.प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही मिळत नसल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे तर शेतकरी आत्महत्या करून कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटत आहे.

जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना

'शेतकरी सुखी तर जग सुखी' असे म्हटले जाते. पण सध्याची परिस्थिती पाहता कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी व्यथित झाला आहे. कांदा भावात सुधारणा न झाल्यास प्रहारच्या वतीने शेतकरी आंदोलन उभे केले जाईल.

कृष्णा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष- प्रहार संघटना

Related Stories

No stories found.