तीन तपाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे डॉ. बापये हॉस्पिटल

तीन तपाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे डॉ. बापये हॉस्पिटल

नाशिक शहरातील प्रथम महिला नेत्ररोग तज्ञ डॉ. मिनाक्षी बापये यांच्या बापये हॉस्पिटलला 16 ऑक्टोबरला 37 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने डॉ. बापये यांच्या नेत्रसेवेवर टाकलेला प्रकाश...

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नेत्रसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. मिनाक्षी बापये यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1946 ला झाला. त्यांचे माहेर कराड. पण त्यांचे आई, वडील पुण्यात रहात. मिनाक्षी बापये पूर्वाश्रमीच्या पुराणिक. त्यांचे दोन्ही थोरले भाऊ व बहीण सुद्धा डॉक्टर आहेत.

डॉ. मिनाक्षी सर्वांमधे धाकट्या आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. मूळातच हुशार असल्यामुळे त्यांचा मेरिटवर पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश झाला.

तेथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1973 मध्ये त्यांनी मुंबईतील सीपीएस येथून ‘डीओएमएस’ हा शिक्षणक्रम सुवर्ण पदकांसह उत्तीर्ण केला. त्यानंतर 1974 साली बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एमएस (नेत्ररोग) पुन्हा एकदा सुवर्णपदकासह उत्तीर्ण झाल्यात. त्यानंतर त्यांचा विवाह डॉ. मनोहर मोरेश्वर बापये यांच्याशी झाला.


1975 या वर्षी नाशिक येथे आल्यात व नेत्ररोग तज्ञ म्हणून वकिलवाडीत कन्सल्टिंग सुरू केले. तोपर्यंत नाशिकला 2-3च नेत्ररोग तज्ञ होते व महिला नेत्र रोग तज्ञ म्हणून त्या पहिल्याच डॉक्टर होत्या. त्याकाळी डोळ्यांच्या लेझर प्रोसिजरसाठी पेशंटना मुंबईला जावे लागत म्हणून डॉ. मिनाक्षी बापये यांनी नाशिकमध्ये सर्वप्रथम लेझर मशीन तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली आणि नव्या तंत्रज्ञानाने सेवा देण्यास सुरूवात केली.

त्याकाळी आतासारखे मार्केटिंग, प्रचार, प्रसारचे साधने नव्हते. प्रसिद्धी रुग्णांद्वारे होत गेली. त्यातून एकेक रुग्ण त्यांची सेवा घेत गेले आणि ख्याती सर्वदूर पसरत गेली. सेवाभावाने झपाटलेल्या डॉ. मनोहर बापये व डॉ. मिनाक्षी बापये स्कूटरवरून त्याकाळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन तेथील स्थानिक डॉक्टरांना भेटून डोळ्यांसबंधी समस्या असलेल्या रुग्णाचे डोळे तपासत. ही सेवा खूपच कष्टप्रद होती. मात्र त्यातून विलक्षण समाधान मिळत असे डॉ. बापये दाम्पत्य आवर्जून नमूद करतात.

दरम्यान, डॉ. मिनाक्षी बापये यांनी चेन्नईच्या शंकरा नेत्रालयातून मेडिकल रेटीना फेलोशिप पूर्ण केली. हैदराबादच्या प्रसिद्ध एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट मधून फॅको-इमल्सिफिकेशन-फेलोशिप पूर्ण केली. या ज्ञानाने त्यांच्या सेवेला आधुनिक उपचाराचे कोंदण लाभले. 1975 पासून नाशिक येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मिनाक्षी बापये यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 16 ऑक्टोबर 1983 मध्ये‘बापये हॉस्पिटल’ची उभारणी केली.

निष्णात नेत्र चिकित्सक म्हणून मायक्रोस्कोपिक आय सर्जरीज, इंट्राऑकूलर लेन्सेस, रीटायनल लेसर ट्रीटमेट, आणि फॅको-इमल्सिफिकेशन या सुविधा देणारे सेवा बापये हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय ठरले.

रुग्णांच्या डोळ्यातील प्रकाश कायम ठेऊन नेत्रज्योती सदैव तेवत राहाव्यात हेच व्रत घेत त्यांनी सेवेचा महायज्ञ सुरू ठेवला. साहजिकच त्यांच्या कार्याची दखल शासनासह सर्वांनाच घ्यावी लागली. त्यांच्या कार्यामुळे अनेक संघटनेच्या अनेक मोठ्यां पदावर काम करण्याची संधी त्याच्याकडे चालत आली.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई च्या 8 वर्षे सदस्य होत्या. नाशिकहून प्रक्टिस करताना त्यांचा महाराष्ट्रातील अनेक नेत्रतज्ज्ञांशी संपर्क, संवाद सुरूच असाचयचा. त्यामुळेच 2005-06 या वर्षात महाराष्ट्र ऑपथॅलमोलाजीकल सोसायटीचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ही निवड माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण होता, असे सांगताना डॉ. मिनाक्षी बापये यांच्या चेहर्‍यावर आजही चमक दिसून येते.

शंकरा नेत्रालय चेन्नई बरोबर नाशिकमध्ये 1991 मध्ये तुलसी आय हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली गेली व सेवाभावाने बिनावेतन मेडिकल डायरेक्टर म्हणून 2003 पर्यंत डॉ. मिनाक्षी बापये तिकडे कार्यरत होत्या. (हॉस्पिटल सुरु करून 10 वर्षांपर्यंत ही सेवा आदिवासी क्षेत्रातील गरीब लोकांसाठी त्यांनी मोफत दिली.)

नेत्रसेवेत डॉ. बापंये देत असलेल्यां योगदानाची दखल शासनासह वेगवेगळ्या संस्थांनी घेतली आणि त्याबंद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये जे. सी. नाशिक तर्फे दिला जाणारा ऑउटस्टॅन्डीग सिटीझन अवार्ड, आयएमए. नाशिक तर्फे बी. सी. रॉय अवार्ड, अर्पण रक्तपेढी, नाशिक तर्फे डॉ. वसंतराव गुप्ते अवार्ड अशा पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नेत्रचिकित्सेसह डॉ. बापये यांनी कलाक्षेत्राची आवड जोपासली. त्यांना राज्य नाट्य स्पर्धेतही पुरस्कार मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाट्य स्पर्धेत त्यांची भूमिका लक्षणीय ठरली. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, डॉ. जब्बार पटेल, सिनेनाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे समवेतही त्यांनी नाटकात भूमिका साकाराल्या. त्यामुळे डॉ. आगाशे, डॉ. पटेल नाशिकला आल्यावर डॉ. बापये यांना आवर्जून भेट देत असतात.

डॉ. मिनाक्षी बापये यांचे पती डॉ. मनोहर बापये ज्येष्ठ युरोसर्जन आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ. मनीष बापये हे निष्णात विट्रीओ रीटायनल सर्जन असून ज्येष्ठ स्नुषा डॉ. चारुता बापये निष्णात पेडीयाट्रीक ऑपथलमोलाजीस्ट व स्क्विंट सर्जन म्हणून नाशिकमध्ये सेवा देत आहेत. कन्या डॉ. मोनिका बापये, एम. डी. एस. होऊन म्याक्सिला फेसियेल सर्जन म्हणून वैद्यकीय सेवा देत आहेत तर जावई तुषार अमेरिकेत कॉम्पुटर इंजिनिअर आहे.

त्यांचा धाकटे चिरंजीव तसेच सून मंदार व शिवांगी हे दोघेही संगणक अभियंता असून सन्फ्रान्सिस्को अमेरिका येथे कार्यरत आहेत. एकूणच सर्वच कुुटुंब उच्चशिक्षीत असून आपल्या क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com