४४ दलालांना पकडले; ३२८ रेल्वे तिकिटे जप्त
नाशिक

४४ दलालांना पकडले; ३२८ रेल्वे तिकिटे जप्त

रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणार्‍यांविरुद्ध कारवाई

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी NashikRoad

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीतील छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८ लाख ६२,१९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेकडून ही माहिती दिली आहे.

रेल्वेने १२ मेपासून १५ जोड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जूनला निवडक १०० विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या घोषणा केली होती. अनेक वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या.

दलालांविरुद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून ६ लाख ९,२९८ किमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजसेवेतही आघाडी

या व्यतिरिक्त, या कोविड-१९ साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी करोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण त्यांनी केले.

लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकार्‍यांसाठी नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com