निफाड । Niphad (प्रतिनिधी)

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात 5 वी मासिक पक्षी प्रगणना नुकतीच करण्यात आली असून यात विविध जातीच्या 32073 पक्ष्यांची नोंद करण्यात आली असल्याचे नांदूरमध्यमेश्वर (वन्यजीव) पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, वनपाल अशोक काळे यांनी म्हटले आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वनअधिकारी, सेवक, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षीतज्ञ यांचे मदतीने 5 वी मासिक पक्षी प्रगणना नुकतीच पूर्ण करण्यात आली. या पक्षी प्रगणनेत चापडगाव, गोदावरी नदीपात्र, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वर, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव अशा एकूण 8 ठिकाणी केलेल्या पक्षी निरीक्षणात विविध पाणपक्षी व गवताळ प्रदेशातील, झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

एकूण 71 प्रजातीचे 31677 पानपक्षी व 51 प्रजातीचे 396 पाणथळालगतचे गवताळ भागातील पक्षी असे एकूण 32073 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रगणनेत सामान्य क्रोंच, मार्श हॅरियर, अॅस्प्रे, उघड्या चोचीचा करकोचा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिलडक, तरंग, चक्रवाल, गढवाल, चमचा, कमळपक्षी, शेकाट्या, नदी-सुरय, पाकोळी आदी पक्षी दिसून आले.

सध्या थंडी टिकून असल्याने पक्षी चांगल्या संख्येने दिसून येत आहेत. यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे गेली काही महिने पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता शासन नियमांच्या अधिन राहून व सोशल डिस्टन्स पाळत पक्षी निरीक्षणासाठी हे पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

नांदूरमध्यमेश्वर येथे करण्यात आलेली पक्षी प्रगणना आशियाई पाणपक्षी प्रगणना सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव नांदूरमध्यमेश्वरचे भरत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, वनपाल अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, आशा वानखेडे, पक्षीमित्र दत्ता उगावकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहा. संचालक डॉ. राजू कसबे, नंदकिशोर दुधे, तुहीना कट्टा, प्रियंका जुंद्रे, विराज आठले, आनंद बोरा, अनंत सरोदे, देशमुख, पक्षी अभयारण्यातील गाईड अमोल दराडे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, नूरी मर्चंड, ओंकार चव्हाण, विकास गारे, सेवक डी. डी. फापाळे, गंगाधर आघाव, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजिव गायकवाड, प्रकाश गांगुर्डे आदींसह नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील गावचे स्वयंसेवक, पक्षीमित्र या पक्षी प्रगणनेत सहभागी झाले होते.