शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता ३० शाळांचा पर्याय

३१ मे पर्यंतच केल्या जाणार बदल्या
शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता ३० शाळांचा पर्याय

नाशिक | Nashik

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर केले. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा आणि २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येईल.

बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाइन अर्जाऐवजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, गटशिक्षणाधिकारी संबंधित अर्ज ऑनलाइन सादर करतील. दरवर्षी ३१ मेपर्यंतच बदल्या केल्या जाणार आहेत.

काही वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बराच गोंधळ होत आहे. या पार्श्वभूमीवर बदल्याचे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र नव्या धोरणातही शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. त्यासाठी आधीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु आंतरजिल्हा बदलीसाठी सध्याच्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असल्याची अट कायम ठेवण्यात आली आहे.

या पूर्वी जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठीचे सात निकष ठरविण्यात आले आहेत. त्यातील निकषांची पूर्तता करणारे क्षेत्र अवघड मानले जाईल. जिल्हांतर्गत बदल्यांसाठीही संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत.

जिल्हांतर्गत बदलीसाठी आता वीसऐवजी तीस शाळांचा पर्याय देता येईल. अवघड क्षेत्रात तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेले शिक्षक बदलीपात्र असतील. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र मानले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


मुद्दे

– वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या पती-पत्नीला आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करायचा असल्यास दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल.

– पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यांत असल्यास आणि त्यांना तिसऱ्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास दोघांपैकी कनिष्ठ असलेल्याची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com