3 हजार 701 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
3 हजार 701 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
नाशिक

3 हजार 701 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

तांत्रिक अडचणी : लाभ देण्याचा प्रयत्न

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । Nashik प्रतिनिधी

महाविकास आघाडीने शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यत दिलेल्या कर्ज माफीचा जिल्ह्यातील एक लाख 14 हजार 177 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. मात्र अद्याप तीन हजार 701 शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीपासून अद्याप वंचित आहे. बँक खाते आधार लिकिंग नसणे, बँक खात्यांचे प्रमाणिकरण न होणे, लाभार्थी मयत होणे अशा काही अडचणीमुळे या शेतकर्‍यांना अद्याप दोन लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा करत कोणत्याही अटीशर्ती न लावता शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यतचे कर्ज माफ़ करत मोठा दिलासा दिला. जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार 216 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यासाठी 1445 कोटी 98 लाखांची आवश्यकता होती. बँक खाते आधारलिंक करुन थेट त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार होती.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात निफाडमधील चांदोरी आणि सिन्नरमधील सोनांबे या दोन गावांतील अनुक्रमे 520 तर सोनांबेतील 258 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन लाख कर्जमाफीची रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतर मार्चच्या प्रारंभी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली व कर्जमाफिचा लाभ मिळू शकला नाही.

त्यानंतर करोनाचे संकट आले. तिजोरीत खडखडाट असल्याने कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नव्हते. मात्र जुलै महिन्यात सरकारने लाभार्थ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यात एक लाख 33 हजार लाभार्थ्यांचे खाते अपलोड करण्यात आले आहे. त्यापैकी एक लाख 21 हजार 390 खात्यांचे प्रमाणिकरण झाले असून एक लाख 14 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मात्र तीन हजार 701 शेतकर्‍यांच्या खात्याचे प्रमाणिकरण तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे.

त्यात प्रामुख्याने लाभार्थी शेतकर्‍याचा मृत्यू,त्यांचे वारस लावणे, मशीनवर बोटांचे ठसे न उमटणे, बँक खात्याला आधारकार्ड लिंक नसणे या प्रमुख अडचणी आहेत. काही शेतकरी विदेशात गेले असल्याने त्यांची प्रामाणिकरणासाठी माहिती मिळू शकली नाही. या अडचणी दूर करुन त्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

तांत्रिक अडचणी प्रकरणे

जिल्हा बॅक - 909

राष्ट्रीयकृत बॅक - 2,792

कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत कर्जमाफीचे एक हजार 39 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. एक लाख 14 हजार शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.3 हजार 701 शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. या अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे.
गौतम बलसाने, नोडल ऑफिसर,कर्जमुक्ती योजना
Deshdoot
www.deshdoot.com