
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ग्रामीण स्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात सुमारे दीड लाख समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या निर्देशानुसार पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दुसरी प्रादेशिक परिषद 6 आणि 7 ऑक्टोबर, 2023 असे दोन दिवस नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे. तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या सहभागी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील सुमारे २०० समुदाय आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६१ हजारपेक्षा अधिक आरोग्य सेवा केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. प्रत्येक उप केंद्रातील प्राथमिक आरोग्य टीममध्ये एक महत्वाची भर म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे १ लाख तीस हजारहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.
या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, आयुष मंत्रालय व राज्य अधिकारी यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी उपस्थित राहणार असल्याचेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.