
सटाणा । प्रतिनिधी Satana
मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल दि. 29 वंचित आघाडी, आदिवासी एकता परिषद व महाविकास आघाडीने शहरातून काढलेल्या मोर्चाच्या समारोपानंतर काही समाजकंटकांनी केलेली तोडफोड व हिंसक घटनांच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 31 जणांपैकी 28 जणांना सटाणा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन संशयितांना सध्या त्यांच्या पालकांच्या सुपूर्त करण्यात आले असून कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना बाल न्यायमंडळ नाशिक यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या प्रकरणी वंचित आघाडीचे अमोल बच्छाव, शेखर बच्छाव, दादा खरे, आदिवासी एकता परिषदेचे म्हाळू पवार, सचिन सोनवणे आदींवर भादंंवि 353, 427, 323, 324, 504 आदी कलमान्वये सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे व दंगल घडविण्यास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चात अर्धनग्न अवस्थेत हजारो तरुण सहभागी झाले होते. मोर्चेकरी मणिपूर येथील घटनेचा निषेध करीत केंद्र शासनाविरोधात घोषणा देत होते. आंबेडकर पुतळ्यापासून प्रारंभ झालेला मोर्चा शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत बस स्टँड जवळील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मोर्चेकर्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ताहाराबाद रस्त्याने मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी मोर्चाच्या आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान मोर्चाचा समारोप झाल्यानंतर तरुणांना शांततेत घरी जाण्याचे आवाहन आयोजकांनी केले मात्र काही समाज विघातक मोर्चेकर्यांनी दोधेश्वर नाक्यावर ठिय्या दिल्यानंतर गोंधळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोधेश्वर नाक्यावर मोर्चेकरांनी ठिया देत आ. दिलीप बोरसे हे मोर्चात का सहभागी झाले नाहीत असा सवाल करीत संताप व्यक्त केला. या तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केल्याने या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पळणार्या तरूणांनी दगडफेक केल्याने पोलिसांसह नागरिक जखमी झाले. तसेच दहा एसटी बसेस व सुमारे 15 खासगी वाहनांचे नुकसान झाले. बस बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न
आम्ही आदिवासी आमदारांनी राज्यपालांना मणिपूर घटनेबाबत निवेदन सादर केले आहे. आजची घटना दुर्दैवी आहे. समाजकंटकांनी गरिबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर कारवाई करावी अशी भावना आ. दिलीप बोरसे यांनी व्यक्त केली आहे.
धरपकड सत्र सुरूच
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सत्र सुरू केले असून मोर्चास हिंसक वळण लावणार्यांचा शोध घेतला जात आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज व नागरिकांनी मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रजनीकांत चुलमुला यांनी सांगितले. या घटनेनंतर नागरिकांनी घेतलेल्या शांततेच्या भूमिकेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.