खरीप हंगामात २ हजार ७०० कोटी कर्ज वाटपाचे उदिष्ट

पालकमंत्री भुजबळ : तातडीने कर्ज द्या
खरीप हंगामात २ हजार ७०० कोटी कर्ज वाटपाचे उदिष्ट

नाशिक । प्रतिनिधी

मान्सूनला प्रारंभ होणार असून यंदाच्या खरिप हंगामात शेतकर्‍यांना २ हजार ७०० कोटींचे रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

त्यानूसार मागील दोन महिन्यात ४४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.३१) खरिप हंगाम कर्ज वाटप बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्याच अनुषंगाने जे शेतकरी कर्जाचे हप्ते व कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील, अशा शेतकऱ्यांना बँकांनी खरीप हंगामासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दयावे, असे आदेश त्यांनी दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा.

तसेच शेतकऱ्यांनी सहकारी संस्थामार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमीनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत.

त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर यांच्यासह सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com