२५ टक्के शासकीय वाहतूक लालपरीतून होणार

२५ टक्के शासकीय वाहतूक लालपरीतून होणार

नाशिक । Nashik

करोना संकटातून सावरण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गत लॉकडाउनमध्ये मालवाहतूक सेवा सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कार्यालयातील विविध विभागांची खासगी वाहतुकीच्या 25 टक्के मालवाहतूक एसटीद्वारे करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

लॉकडाउनमुळे गेल्यावर्षी एसटीची चाके दीर्घकाळ हलली नव्हती. यंदाही रुग्णसंख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध आणले आहेत. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाला आर्थिक फटका सोसावा लागतो आहे. उत्पन्नावर परिणाम झाल्याने महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला आहे.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्या वाहतुकीसाठी मोजक्या संख्येने बस धावत आहेत. अडचणीच्या काळात महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उपसमिती गठित केली होती. या समितीमार्फत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यानुसार आता शासकीय कार्यालयांतील विविध विभागांच्या खासगी माल वाहतुकीपैकी पंचवीस टक्के एसटी महामंडळाच्या गाड्यांतून केली जाणार आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर सोपविण्यात आली आहे. आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा वाहतूक ठप्प आहे.

लोकांचा प्रवास कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम एसटी महामंडळावर झाला आहे. उत्पन्न घटल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सुध्दा एसटी प्रशासनाला राज्य शासनाच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com