मिशन झिरो नाशिक
मिशन झिरो नाशिक
नाशिक

मिशन झिरोच्या तपासणीत २४५ पॉझिटीव्ह

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोनाचा वाढता संसर्ग रोकण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या मिशन झिरो अंतर्गत सुरू झालेल्या मोबाईल डिस्पेन्सरीची व्यापी वाढविण्यात आली आहे. आता २५ फिरत्या वाहनातून ही तपासणी सुरू असुन मंगळवारी (दि.४) दीड हजारावर नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन यात २४५ नागरिक करोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे.

शहरात करोनाचे वाढते संक्रमण रोकण्यासाठी आता महापालिकेकडुन शहरात अ‍ॅटीजेन चाचणी व करोना चाचणींची संख्या ३ हजारापर्यत नेण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेकडुन काही सामाजिक संस्थाच्या मदतीने शहरात मिशन झिरो सुरू करण्यात आले असुन याद्वारे २५ फिरते दवाखाने सुरु करण्यात आले आहे.

या फिरत्या दवाखान्यात प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. यात करोना रॅपिड टेस्ट म्हणुन अ‍ॅटीजेन चाचणी केली जात असुन यात रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास तातडीने रुग्णालयात किंवा घरी विलगीकरण म्हणुन उपचार दिले जात आहे. यात महापालिकेने आता आणखी पाच वाहने वाढविल्याने आता फिरत्या दवाखान्यांची संख्या 25 झाली आहे. मंगळवारी दिवसभरात मिशन झिरो अंतर्गत २५ ठिकाणी १५९५ जणाांंची तपासणी झाली.

या सर्व लोकांच्या अ‍ॅटीजेन चाचण्या करण्यात आल्यानंतर यात २४५ जण पॉझिटीव्ह निघाले. यात कुमावतनगर पंचवटी १०९, सोमवार पेठ जुने नाशिक १०० व सावतानगर नवीन नाशिक १०० सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

मनपाच्या कॉल सेंटरद्वारे ४९ खाटांचे वाटप

महापालिका प्रशासनाकडुन करोनासंदर्भात विविध प्रश्न व खाटांची व्यवस्था करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरला पाच दिवसात २९५ इतके कॉल आले होते. यातील ९१ कॉल करोना बाधीतांना खाटा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात होते. यात कॉल सेटरच्या मदतीने ४९ जणांना रुग्णालयात खाटा उपलब्ध करुन देण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com