विवाह वर्‍हाडींना भोवला? आठवडाभरात २२ पॉझिटीव्ह

मलढोण येथील घटना
विवाह वर्‍हाडींना भोवला? आठवडाभरात २२ पॉझिटीव्ह

वावी । Vawi

शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाकडे दुर्लक्ष करत धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवल्यानंतर सिन्नरच्या पुर्व भागातील मलढोण या गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

विवाहसोहळा असणार्‍या घरातील, वर्‍हाडी मंडळींना कोरोना संसर्ग झाला असून, आठवडाभरात तब्बल 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वाढत्या करोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाकडून विवाह सोहळ्यांसाठी निर्बंध लादण्यात आले आहे. पुर्वी 50 जणांच्या उपस्थितील विवाह सोहळ्याला देण्यात येणारी परवानगी आता केवळ 25 वर आली आहे.

मात्र तरी देखील प्रशासनाला अंधारात ठेवून गर्दी जमवत विवाह सोहळे सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. प्रशासकीय यंत्रणेला अंधारात ठेवून झालेल्या अशाच एका विवाहाने सिन्नर तालुक्यातील मलढोण येथे मात्र उपस्थितांची चांगलीच थांदल उडवल्याची चर्चा आहे.

गत आठवड्यात झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या वर्‍हाडी मंडळींना तसेच यजमानांच्या कुटुंबात अनेकांना लग्न आटोपल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यात काहींनी वावी, सिन्नर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणी करून घेतली. स्थानिक पातळीवर उपचार देखील घेतले. त्यानंतर गावातील अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याच्या व्याधींनी ग्रासले.

सुरुवातीला चार, नंतर आठ तर दोन दिवसांपूर्वी तब्बल दहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची देखील चांगलीच धावपळ उडाली. गावात रंगलेल्या विवाह सोहळ्याबाबत सर्वांनी गप्प राहणे पसंत केले आहे. असे असले तरी दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

दरम्यान, या लग्न सोहळ्यासाठी वावीच्या पूर्व भागातील अनेक गावातील नागरिक उपस्थित असल्याचे बोलले जाते. या उपस्थितीमुळे परिसरातील गावांमध्ये देखील काही रुग्ण आढळून आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मलढोण गावात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने वावी आरोग्य केंद्रामार्फत तातडीच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्थानिक आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत गावात सर्वेक्षण करण्यात येत असून, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना तपासणी करून घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाण्याची सूचना करण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com