सिन्नर तालुक्यात २०२ बाधित
नाशिक

सिन्नर तालुक्यात २०२ बाधित

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १८ संशयितांना ‘करोना’चा संसर्ग झाल्याचा अहवाल आला असून तालुक्यातील रुग्णांची संख्या २०२ वर पोहचली आहे. दोन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज चास व सिन्नर शहरात प्रत्येकी सहा रुग्ण आढळले असून पास्तेत चार, पांढुर्ली व मुसळगाव येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.

काल २० संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील दोन निगेटीव्ह निघाले. चास येथे सापडलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील ४० व २४ वर्षीय पुरुष, २२ व ३७ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगी व ३ वर्षीय चिमुरड्याला ‘करोना’ संसर्ग झाला आहे. पास्तेत ३५ वर्षीय तरुण, ३२ वर्षीय तरुणी, ११ व १२ वर्षीय मुलगा ‘करोना’ बाधीत निघाले आहेत. पांढुर्लीत ३६ वर्षीय तरुण तर मुसळगावला ४० वर्षीय महिलेलाही संसर्ग झाला आहे. मुसळगाव येथील ही महिला मुळ कोपरगाव येथील असून मुसळगाव-गोंदे रस्त्यावरील हाबेवाडी परिसरातील माहेरी ही महिला आली असल्याचे समजते.

शहरात आज ६ रुग्णांची भर पडली. उद्योग भवन येथे ३२, वृंदावननगरला ४० वर्षीय महिला ‘करोना’ बाधीत आहेत तर विजयनगरला ४४ वर्षीय पुरुष, कापसे मळा (आश्विनाथ नगर) येथे २४ वर्षीय तरुण बाधीत निघाले आहेत. मुक्तेश्वर नगरमधील ३५ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलालाही ‘करोना’ने गाठले आहे. मुक्तेश्वरनगर, उद्योगभवन येथील रुग्ण पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

तेरा रूग्ण घरी परतले

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३ रुग्ण बरे झाल्याने काल (दि.८) घरी परतले. त्यामुळे बरे झशलेल्या रुग्णांचीसंख्या १३५ झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या ५४ असून नाशिकला जिल्हा शासकीय व खासगी रुग्णालयात ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विंचूर दळवी येथील ६२ वर्षीय ज्येष्ठाचा रविवारी (दि.५) मृत्यू झाल्याने तालुक्यात ‘करोना’ संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६ झाली आहे. अजून २१ संशयितांचे अहवाल येणार आहेत.

‘तो’ कारखाना वाढवतोय संसर्ग

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याच्या मालकाला ‘करोना’चा संसर्ग झाल्यानंतरही कामगार, व्यवस्थापनाच्या बैठकीला हा मालक उपस्थित राहीला. या बैठकीतच माळेगावच्या माजी सरपंचासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्यालाही संसर्ग झाला. या बैठकीत उपस्थित असलेल्या ४२ अधिकारी, सेवकांना आरोग्य विभागाने होम क्वॉरंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. उद्योग भवन, मुक्तेश्वर नगरमध्ये आढळलेले रुग्ण याच बैठकीतले असल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबियांपर्यंत ‘करोना’चे लोन गेल्याचे आजच्या अहवालाने दाखवून दिले आहे. आरोग्य विभागासह तहसिलदारांनी या कारखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन उत्पादन बंद करण्याची सुचना केली होती. त्यानुसार हा कारखाना बंद असून येत्या रविवार(दि.१२) पासून या कारखान्यातील उत्पादन पुन्हा सुरु होणार असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com