२०१० किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ दिवसांत कापले; दिव्यांग सायकलीस्ट अजयचा विक्रम

२०१० किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ दिवसांत कापले; दिव्यांग सायकलीस्ट अजयचा विक्रम

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई ते गोंदिया आणि पुन्हा मुंबई हा 2010 कि.मी. प्रवास अवघ्या 12 दिवसात एका दिव्यांग युवकाने पूर्ण करत नव्या आणि अनोख्या विक्रमाची नोंद केली. अजय ललवाणी असे या दिव्यांग युवकाचे नाव आहे....

मुंबई - गोंदिया - मुंबई या साहसी सायकल मोहिमेला ३ डिसेंबर २०२० ला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून सुरुवात झाली होती. दररोज सुमारे 170 कि.मी. सायकल चालवत 9 तारखेला गोंदिया येथे अजय पोहोचला.

गोंदिया येथून पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास तो करत आहे. अजय सोबत एकूण 10 सहकारी आहे. दिव्यांग हे सर्वसामान्यांच्या तुलनेत कोणत्याही बाबतीत कमी नाही हे अजयला दाखवून द्यायचे आहे तसेच करोनामुळे, गेल्या आठ महिन्यापासून सतत जाणवणारी भीती, चिंता यावर मात करून अजयने या मोहिमेचे धाडस केले.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी अजय प्रयत्न करत आहे. अजय हा जन्मापासूनच दिव्यांग आहे. विविध क्रीडा प्रकारात यापूर्वीही अजयने अनेक प्राविण्य मिळवलेले आहे.

मुंबई येथे उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात तो नोकरीला आहे. जिद्द चिकाटी आणि प्रयत्न या गोष्टी असल्या तर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो असे अजय सांगतो.

आज सकाळी 11 वाजता मुंबई नाका येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने अजयचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलीस्टचा टी-शर्ट अजयला भेट दिला.

तसेच शाल-श्रीफळ, हार व मिशन फॉर हेल्थ चे मेडल प्रदान करून अजयचा यथोचित सत्कार केला व पुढील 180 किलोमीटर च्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, संजय पवार, सुरेश डोंगरे, ऐश्वर्या वाघ, वेदांत वाघ, संकेत भानोसे, संदीप भानोसे, अविनाश येवलेकर आदींसह इतर सायकलिस्ट उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com