नाशिक । Nashik

नॉयलॉन मांजाने एका महिलेचा बळी घेतल्यानंतर गुरूवारी एक पुरूष व एका युवतीचा मांजाने गळा चिरल्याचे प्रकार घडले. दरम्यान गुन्हे शाखा दोनच्या पथकाने सातपूरच्या पिंपळगाव बहुला परिसरातून 19 हजार 400 रूपयांचे 29 नॉयलॉन मांजाचे रिळ जप्त केले. तसेच या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रसाद रमेष धनराळे (रा. पिंपळगाव बहुला, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव बहुला परिसरात नॉयलॉन मांजांची चोरटी विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या पथकाचे निरिक्षक अजय शिंदे यांना मिळाली होती.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोतीलाल महाजन, अभिजीत सोनवणे, मिथून म्हात्रे, संपत सानप, संतोष माळोदे, बाळासाहेब नांद्रे, महेंद्र सोंळुखे यांच्या पथकाने गरुवारी सायंकाळी पिंपळगाव येथील संशयित दुकानावर छापा टाकून धनराळे यास ताब्यात घेतले.

दुकानाची तपासणी केली असता बंदी असलेल्या 19 हजार 400 रूपयांच्या नॉयलॉन मांजाचे 29 रिळ तेथे आढळून आले. रिळ पोलीसांनी जप्त केले असून धनराळे यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुरूवारी सकाळी इंदिरानगर परिसरात एका दुचाकीवरील व्यक्तीचा गळा मांजाने कापून त्याला 8 टाके पडल्याची घटना घडली. तसेच पंचवटी हनुमानवाडी येथेही एका दुचकीस्वार युवतीच्या गळ्यास मांजा अडकल्याची घटना घडली.

गळ्यात स्कार्फ असल्याने युवती बालंबाल बाचवली. मांजामुळे पक्ष्यांबरोबरच अनेक नागरीकांना जखमी केल्याच्या घटना वाढत असून नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.