जिल्ह्यात १८ टँकर सुरु ; येवल्यात सर्वाधिक टंचाई

जिल्ह्यात १८ टँकर सुरु ; येवल्यात सर्वाधिक टंचाई
टँकर

Nashik । नाशिक

उन्हाच्या झळा तीव्र होताच ग्रामीण भागात पाणी टंचाईलाही सुरुवात झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ टॅकर सुरु आहेत. सर्वाधिक टंचाई ही येवला तालुक्यात असून या सर्वाधिक १३ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर सुरगाणा २, चांदवड २ व देवळा तालुक्यात १ टॅकर सुरु आहे. दरम्यान, करोना संकटामुळे आता प्रांताना टॅकर मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तुलनेने कमी आहे. नेहमीचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होते. टॅकरद्वारे ग्रामीण भागातील वस्त्या व वाडयांमध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात होते. यंदा एप्रिल अखेर उजाडला तरी फक्त १८ टॅकर सुरु आहे.

पण हळूहळू तापमानाचा पारा चढत असून उन्हाच्या झळा तीव्र होत आहे. जलाशयांमधील पाणीसाठा कमी कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही अाटत आहेत. पुरेसे पाणी नसल्याने लागलीच पर्यायी व्यवस्थेची मागणी होत आहे. त्यानुसार शासनाकडून नुकतेच खासगी टँकर्स पुरवठादाराचीही नियुक्ती झाल्याने टँकरचा पुरवठा केला जात आहे. येवल्यात मागील आठवड्यात पाच गावांसाठी ३ शासकीय टँकरचा पुर‌वठा सुरु करण्यात आला होता.

त्यानंतर आठवडाभरातच येवल्या तालुक्यातून १२ गावे आणि २५ वाड्यांकडून पाणी टँकरची मागणी तहसीलदारांनी केली. त्यानुसार त्याचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला.करोना संकटात प्रांताधिकाऱ्यांनाच टँकरचे मंजूरीचे अधिकार वितरीत करण्यात आले. त्यानुसार पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांनाच टँकर सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले.

सद्यस्थितीत एकूण १३ टँकर मंजूर आहेत. जिल्हयात इतरही तालुक्यात टॅकरची मागणि होत आहे. सुरगाणा २, चांदवड २ व देवळा तालुक्यासाठी १ टॅकर प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com