सटाणा कोविड केअर सेंटरला १७ ऑक्सिजन मशीन भेट

आमदार बोरसे यांचा पुढाकार; तुटवडा काळात रुग्णांना दिलासा
छायाचित्र: दीपक सुर्यवंशी
छायाचित्र: दीपक सुर्यवंशी

मुंजवाड | वार्ताहर

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. ऑक्सिजनच्या तुटवडयामुळे बहुतांश रुग्ण दगावत आहे. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे सरसावले असून त्यांनी पहिल्या टप्प्यात आपल्या स्थानिक निधी मधून सुमारे 17 स्वयंचलित ऑक्सिजन तयार करणार्‍या यंत्रांचे आज सोमवारी (दि.19) लोकार्पण करण्यात आले.

ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात रुग्णांसाठी संजीवनी ठरणारे यंत्र स्थानिक निधीमधून देणारे आमदार दिलीप बोरसे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णांना कुठे ऑक्सिजन बेड मिळत नाही . मिळाला तर ऑक्सिजन शिल्लक नाही . बागलाण तालुक्यात नामपुर येथे कोविड रुग्णालयाला प्रशासनाने मंजूरी दिली.

मात्र ऑक्सिजन नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ते अजूनही रुग्णांसाठी खुले करता आले नाही. अशी भयावह परिस्थितीत रुग्णाचा मात्र जीव जातांना दिसत आहे.

रुग्णांची ऑक्सिजन अभावी हेळसांड होऊ नये म्हणून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या स्थानिक निधी मधून पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपये किंमतीचे स्वयंचलित ऑक्सिजन तयार करणारे 17 यंत्र आज सोमवारी (दि.19) शहरातील नामपुर रस्त्यावरील कोविड केअर सेंटर मध्ये लोकार्पण केले.

ही 17 यंत्रे 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 1 आणि तीन ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी दोन देण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे रूग्णांच्या सोयीसाठी सध्या ते केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहेत.

या लोकार्पण कार्यक्रमास बागलाणचे प्रांत विजयकुमार भांगरे ,तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील ,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव ,डॉ. सोनजे ,बिंदुशेठ शर्मा ,मुन्ना भामरे ,अनिल दळवी ,अरुण भामरे,अजितसिंग खैरणार आदि उपस्थित होते. याप्रसंगी आमदार बोरसे यांनी स्थानिक निधीच्या दुसर्‍या टप्प्यात आणखी 31 ऑक्सिजन यंत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली .

यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत बागलाण काही प्रमाणात स्वयंपूर्ण होईल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला . प्रांत भांगरे म्हणाले की ,ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा असतांना आमदार बोरसे यांनी ऑक्सिजनचे स्वयंचलित यंत्र देऊन रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे .

ही यंत्र आजच्या घडीला रुग्णांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे ते म्हणाले . डॉ. अहिरराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान ऑक्सिजनच्या तुटवडाकाळात रुग्णांसाठी संजीवनी ठरणारे स्वयंचलित ऑक्सिजन तयार करणारी ही यंत्रे स्थानिक निधीमधून उपलब्ध करून देणारे आमदार दिलीप बोरसे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com