१६६९ अतिक्रमित घरे नियमित
नाशिक

१६६९ अतिक्रमित घरे नियमित

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १ हजार ६६९ अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यात आली आहेत. या अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर मिळकतीची नोंद झालेले उतारे लवकरच वाटप केले जातील, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

तालुक्यात शासकीय जमिनीवर सुमारे १० हजारांपेक्षा जास्त निवासी घरकुलांचे अतिक्रमण आहे. गोरगरीब नागरिक या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने सदरची घरे त्यांच्या नावावर करावीत, यासाठी २००५ पासून पाठपुरावा सुरू होता अशी माहिती देत भुसे म्हणाले, ग्रामविकास राज्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला होता.

ज्या गावात २०११ पूर्वीचे शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण होते ते कायम करण्याबाबतचे पुरावे शासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतींमार्फत भरण्यात आले होते. आता १६६९ निवासी अतिक्रमण कायम करण्यात आले आहेत. उर्वरित अतिक्रमण कायम करण्यासाठी तालुकास्तरावर शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.

ज्यांचे निवासी अतिक्रमण मंजूर झालेले नाही त्यांनी ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून आपले प्रकरण शक्ती प्रदत्त समितीकडे ग्रामपंचायतीमार्फत सादर करावे. उर्वरित निवासी अतिक्रमणेही लवकरच मंजूर करून उतारे वाटप करण्यात येतील, असे भुसे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com