अंत्यसंस्कारांसाठी 1,645 टन लाकूड खर्ची

करोनाकाळात नाशकात मृत्यूच्या प्रमाणात वाढ
अंत्यसंस्कारांसाठी 1,645 टन लाकूड खर्ची
USER

नाशिक । निशिकांत पाटील

आजकाल नाशिक शहर करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले असून अमरधाममध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. अशा स्थितीत जानेवारी 2021 च्या तुलनेत एकट्या एप्रिल महिन्याच्या मध्यात अंत्यसंस्कारांसाठी लागणार्‍या लाकडाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते 15 एप्रिल 2021 या अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरात अंत्यविधीसाठी 1,645 टन इतक्या मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर झाला आहे.

नाशिक मनपा क्षेत्रातील सर्वच विभागांत मनपाकडून मोफत अंत्यसंस्कार केले जातात. मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत पंचवटी विभागात अंत्यसंस्कारासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये प्रत्येकी 70 टन, मार्च 2021 मध्ये 200 तर 15 एप्रिलपर्यंत 150 टन मिळून 490 टन लाकूड वापरण्यात आले.

नाशिकरोड विभागात जानेवारी 2021 मध्ये 30 टन, फेब्रुवारी 2021 मध्ये 39 टन, मार्च 2021 मध्ये 70 तर 15 एप्रिलपर्यंत 130 टन असे एकूण 269 टन लाकूड वापरण्यात आले. नाशिक पूर्व विभागात जानेवारीत 93 टन, फेब्रुवारीत 92 टन, मार्चमध्ये 150 तर 15 एप्रिलपर्यंत 167 टन लाकूड असे एकूण 502 टन लाकूड वापरले गेले. नवीन नाशिक विभागात जानेवारीत 43 टन, फेब्रुवारीत 47 टन, मार्चमध्ये 60 तर 15 एप्रिलपर्यंत 120 टन लाकूड असे 270 टन लाकूड वापरले गेले. सातपूर विभागात जानेवारीत 18 टन, फेब्रुवारीत 21, मार्चमध्ये 30 तर 15 एप्रिलपर्यंत 45 असे एकूण 114 टन लाकूड वापरण्यात आले. जानेवारी ते 15 एप्रिल 2021 दरम्यान एकूण 1,645 टन लाकूड अंत्यविधीसाठी सर्व विभागांतून वापरण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.

जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्यांत सरासरी 344 टन लाकूड

अंत्यविधीसाठी लागले. चालू एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत 612 टन लाकूड अंत्यविधीसाठी लागले. यावरून नाशकातील मृत्यूचे प्रमाणात लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट होत आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी आता तरी करोनाविषयक सरकारी नियमांचे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळून करोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com