मीटर नसलेल्या घराचे वीज बिल तब्बल १६ हजार
नाशिक

मीटर नसलेल्या घराचे वीज बिल तब्बल १६ हजार

सहा महिन्यांचे बिल

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक | New Nashik

एका दिव्यांग महिलेचे घरगुती वापर असलेल्या विजेची गेल्या सहा महिन्याचे विज बिल सोळा हजार रुपये आल्याने तिच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शहरातील झोपडपट्टी वासीयांचे पुनर्वसन करण्यात आलेली अंबड येथील चिंचोळे शिवारातील महापालिकेच्या घरकुल योजनेच्या इमारत क्रमांक २ मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १ मध्ये चंद्रकला मकासरे या आपली सून व तीन नातवांसह गेल्या दोन वर्षांपासून राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. तर घराचा करता धरता कमवता मुलगा घर सोडून निघून गेला. आता या घराची संपूर्ण गुजरान सुनबाईवर अवलंबून आहे . त्यातच लॉक डाउन असल्यामुळे अधून - मधून कामही बंद असते. अशातच घराचे लाईट बिल थकल्याने सहा महिन्यापूर्वी विद्युत कर्मचाऱ्यांनी लाईट मीटर काढून नेले होते. तेव्हापासून त्या परिवारासह अंधारात दिवस रात्र काढत असल्याचे भयावह चित्र निराधार, विधवा व पायाने अपंग असलेल्या दिव्यांग महिलेच्या बाबतीत घडल्याचे दिसून येत आहे . महिन्याला सरासरी दोनशे ते तीनशे रुपये लाईट बिल येणाऱ्या घराला सहा महिन्याचे तब्बल सोळा हजार एकशे वीस रुपये ( १६,१२० ) इतके अवाच्या सव्वा बिल आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशाच प्रकारच्या वाढीव बिलामुळे नवीन नाशिक, अंबड परिसरातील वीजग्राहक त्रस्त आहेत.

चंद्रकला मकासरे व लाईट बिल प्रतिक्रिया घरकुल योजनेतील दोन छोट्या रूम आहे. एक टीव्ही आणि दोन बल्प असताना आतापर्यंत केवळ दोनशे तीनशे रुपये महिन्याचे सरासरी लाईट बिल येत होते. तर मागील सहा महिन्यापासून मीटर काढून नेल्यामुळे बिलाचा प्रश्नच येत नव्हता. तरीदेखील सोळा हजार एकशे वीस रुपये बिल आल्याने आता 'जगाव की मराव " असा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला आहे. यावर वरिष्ठांनी दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा जेणेकरून नव्याने मीटर लावून आमच्या घरात प्रकाश येईल .

-चंद्रकला मकासारे ,

वीज ग्राहक व दिव्यांग महिला

घरकुल योजनेत अनेक वीज ग्राहकांना वाढीव बिल आले आहे . त्यासंदर्भात आम्ही वीज वितरण कार्यालयावर मोर्चा देखील काढला. अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत एकाही वीज ग्राहकांचे बिल कमी करण्यात आलेली नाही.

चंद्रकांत पाटोळे उपजिल्हाध्यक्ष रिपाई

Deshdoot
www.deshdoot.com