157 बाधितांची करोनावर मात

दाभाडी केंद्रात उपचाराबरोबर मानसिक आधार
157 बाधितांची करोनावर मात
157 बाधितांची करोनावर मात

मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी तालुक्यात मात्र करोनामुक्त रुग्णांची वाढत असलेली संख्या दिलासा देणारी ठरत आहे. दाभाडी करोना उपचार केंद्रातून 20 बाधितांसह हायरिस्कमधील 36 अशा 56 रुग्णांची घरवापसी फुलांच्या वर्षावात केली गेली.

योग्य उपचार, मार्गदर्शन व विशेष म्हणजे बाधितांचे मनोबल वाढावे यास्तव राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे दाभाडीचे उपचार केंद्र रुग्णांबरोबरच कुटुंंबियांनादेखील चिंतामुक्त करणारे ठरले आहे. तालुक्यात 225 बाधित रुग्ण झाले असले तरी आजपर्यंत 157 बाधितांनी करोनातून मुक्त होत यशस्वीरीत्या घरवापसी केली आहे.

तालुक्यातून 9 बाधितांचा बळी करोनाने घेतला असला तरी अनेक अत्यवस्थ रुग्णांना यशस्वीरीत्या संकटातून बाहेर काढण्याची कामगिरीदेखील दाभाडीसह झोडगे आरोग्य केंद्राने बजावली आहे.

बाधित रुग्ण मात्र कुठलेही लक्षणे नाहीत अशांना दाभाडी केंद्रात तर ऑक्सिजनची आवश्यकता भासणार्‍यांना झोडगे केंद्रात दाखल केले जाते. खूपच त्रास व व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्यांना मालेगावी सहारामध्ये दाखल केले जात आहे.

बाधितांचे निकटवर्तीय तसेच संपर्कात आलेल्यांचे स्त्राव मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्यामुळे संक्रमणावर नियंत्रण येत आहे. विशेष म्हणजे चहा, नाश्ता व दोन वेळचे जेवण असा सकस आहार, पिण्यासाठी गरम पाणी तसेच मराठा महासंघाचे कार्यकर्ते काजू, बदामसह इतर पोषक आहार रुग्णांना देत आहेत.

रुग्णांचे मनोबल वाढावे यास्तव वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम यांच्यासह आरोग्य पथक, मराठा महासंघाचे कार्यकर्ते बाधितांच्या अडचणी दूर करण्यासह दररोज त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचे मनोबल वाढवत आहेत.

तर वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद गुंदे, डॉ. हितेश महाले हेदेखील रुग्णांच्या तपासणीसाठी भेट देत असल्याने त्याचा लाभ करोनामुक्तीसाठी होत आहे. जलद उपचार, निकटवर्तीयांची स्त्राव तपासणी, पोषक आहार तसेच खासगी डॉक्टरांकडून मिळत असलेल्या औषधांच्या सहकार्यामुळे रुग्णांचे करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अतिधाडस टाळल्यास संक्रमण थांबेल

आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांकडे अतिधाडसामुळे होत असलेल्या दुर्लक्षानेच संक्रमण वाढत आहे. लग्न, अंत्यविधी तसेच इतर कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांना मोठ्या प्रमाणात बाधा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर व गर्दीचे ठिकाण टाळून तीन फुटांच्या अंतराची दक्षता घेतल्यास संक्रमण नियंत्रणात येईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com