जिल्हा रुग्णालयात १५० वाढीव बेड

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची माहिती
जिल्हा रुग्णालयात १५० वाढीव बेड

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हाभरात करोनाचा उद्रेक सुरू असून ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी आता जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतही कोविड कक्ष सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी वाढीव 150 बेडची निर्मिती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आज बुधवारपासून येथे रुग्ण दाखल होऊ शकतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. यामुळे जिल्हा रुग्णालयात एकूण 300 बेडची क्षमता होणार असल्याने रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दररोज किमान दीड ते दोन हजाराहून अधिक रुग्ण बाधित आढळून येत आहेत. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांची संख्या 90 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर मंगळवारपर्यंत एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार होती.

शहरातील बाधित अत्यवस्थ रुग्णांना उपचारांकरता दाखल होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात अद्याप तेवढ्या सुविधा नाहीत. त्यामुळे हे रुग्ण उपचारासाठी शहरात धाव घेतात. परंतु करोना संकटकाळात या रुग्णांना बेड मिळणेही मुश्किल ठरत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय हे प्रामुख्याने अशा रुग्णांसाठीच असून येथे कोविड कक्षात सुरुवातीला 110 रुग्णांना उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु ही संख्या तोकडी ठरू लागल्याने पुन्हा अतिरिक्त 90 बेड वाढवून एकूण बेडची संख्या 200 पर्यंत करण्यात आली.

नव्याने वाढवण्यात येणारे बेड हे जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत तिसर्‍या मजल्यावर असणार आहेत. हा सर्व मजला ग्रामीण भागातील कोविडबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची अन्य मजल्यांवर व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या अन्य रुग्णांशी अथवा मजल्यांशी कोविड बाधितांचा संबंध येऊ नये याकरता या कोविड कक्षात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र जिन्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये भरून गेली आहेत. तर अनेक रुग्ण शहराकडे धाव घेत आहेत. अशांसाठी जिल्हा रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर कोविड कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे ऑक्सिजन बेडसह आवश्यक सुविधा असतील. आज बुधवारी दुरुस्तीची किरकोळ कामे पूर्ण करून हा कक्ष रुग्णसेवेसाठी सज्ज होईल.

डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com