रेशनचा काळा बाजार; १५ दुकाने सील

२४ हजार दंड वसूल
रेशन दुकान
रेशन दुकान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोना व्हायरस ही संकट नसून संधी असा समज करुन लाॅकडाऊनकाळात रेशनचा काळा बाजार करणार्‍या जिल्ह्यातील १५ दुकानांना जिल्हा पुरवठा विभागाने सील केले असून त्यांचे परवाने रद्द केले आहे. या दुकानदारांकडून २४ हजारांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे रेशनचा काळा बाजार करणार्‍या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात २३ मार्चला लाॅकडाउन लागू झाला. प्रारंभी एक महिना असलेल्या लाॅकडानचा पाचवा टप्पा सुरु आहे. लाॅकडाउनकाळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी एप्रिल, मे व जुन या तिन महिन्याची शिधा रेशन कार्ड धारकांना देण्याचा निर्णय घेउन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. नंतर रेशन कार्ड नसलेल्यांचे सर्वेक्षणकरुन प्रत्येकी पाच किलो तांदुळ मोफत दिले जात आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला तूर व हरबरा डाळ देखील वितरीत केली जात आहे. मात्र या संकट काळातहि काहि रेशन दुकानदारांनी गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिरावत अन्नधान्याचा काळा बाजार केल्याचे समोर येत आहे. थोडयाफार फायदयासाठी रेशनचे धान्य बाजारपेठेत विकून मलिदा कमवला जात आहे.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने छापे टाकत धडक कारवाई करुन जिल्ह्यातिल १५ दुकाने सील करुन त्यांचे परवाने रद्द करुन जोरदार दणका दिला. त्यात नाशिक शहर व तालुक्यातील ६ दुकाने, मालेगाव ३, येवला २, दिंडोरी, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एक रेशन दुकानांचा समावेश आहे.

त्य‍ांच्याकडून २४ हजारांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला असून त्यांचे अन्नधान्य वितरणाचे परवाने रद्द करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असल्याने रेशन दुकानदाराचे धाबे दणाणले आहेत.

लाॅकडाऊन लागल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत रेशनचा काळा बाजार करणार्‍या १५ दुकाने सील करण्यात आली असून त्यांच्याकडुन २४ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. काळा बाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात रोज भरारी पथके फिरतीवर आहे.

- डाॅ.अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com