नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्यावतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील १४७ अंगणवाडी मदतनीस यांना गुरुवारी (दि.१७) थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात सेवकांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने सेवकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करून ही प्रक्रिया राबविण्यात आली. मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देऊन अत्यंत महत्वाचा विषय मार्गी लावण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या हस्ते मदतनीसांना आदेश देण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, तसेच जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. बालविकास विभागातील सर्व कर्मचारी वर्ग,कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड यांनी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी सेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सर्व विभागांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यात मोठया संख्येने सेवकांचे प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत.