सिन्नर शहरात १४ दिवसांसाठी संचारबंदी लागू

शहर प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत
सिन्नर
सिन्नर

सिन्नर । विलास पाटील

शहरातील ‘करोना’ बाधीतांची वाढती संख्या पाहता सिन्नर नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी घोषीत केले असून आज (दि.२१) पासून ४ ऑगस्टपर्यंत संपूर्ण गावात प्रतिबंधीत क्षेत्राचे नियम लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण नगर परिषद क्षेत्रात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमधून कोणतीही व्यक्ती बाहेर येणार नाही अथवा बाहेरील व्यक्ती शहरात प्रवेश करणार नाही. फक्त वैद्यकीय कारणासाठीच बाहेर व आत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरातील पतसंस्था, बँकांचे व्यवहारही या कालावधीत बंद राहतील. मद्य विक्रीची दुकानेही बंद राहतील. तर सर्व शासकीय कार्यालय नियमितपणे सुरू राहतील.

प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकारी, व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज (दि.21) तहसिलदार राहूल कोताडे यांच्या दालनात पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशाराही तहसिलदारांनी नंतर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. नगर परिषद हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत. नागरीकांनी अतिआवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असेही आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

प्रांताधिकाऱ्यांनी सिन्नर शहरासह सर्व उपनगरांमधील ३ किमी परिसर कंटेनमेंट झोन म्हणून व ५ किमीचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत करणारा आदेश काढला असून कंटेनमेंट झोन ऑफीसर म्हणून मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांची नियुक्ती केली आहे. घोषीत कंटेनमेंट झोनमधील सर्व अस्थापना, व्यवसाय पुढील आदेशापर्यंत तातडीने पूर्णपणे बंद करावेत व संपूर्ण कंटेनमेंट झोनमध्ये पूर्णपणे संचारबंदी लागू करावी असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदारांसह पोलीस निरिक्षकांना दिले आहेत.

मास्क केवळ गळ्यात अडकवण्यासाठी नसून करोना प्रतिबंधासाठी दिलेले निर्देश व उपाययोजना ह्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून सर्व नियमांचे पालन करुन करोना निर्मुलन ही एक लोकचळवळ तयार करावी. सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातूनच या आपत्तीचे निवारण होऊ शकते असेही तहसिलदारांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com