शेतकरी फसवणुकीचे १४ गुन्हे दाखल

शेतकरी फसवणुकीचे १४ गुन्हे दाखल

नाशिक । Nashik

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतकर्‍यांचा माल खरेदी करून फसवणुक करणार्‍या 14 व्यापार्‍यांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर यातील एका व्यापार्‍याकडून एका शेतकर्‍याचे साडेसात लाख रूपये पर मिळाले आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक म्हणुन पदभार स्विकारताच नाशिकचे भूमीपुत्र असलेल्या डॉ. प्रताप दिघावकर यांनी सर्वात प्रथम शेतकर्‍यांचा कैवार घेतला आहे. विभागात द्राक्ष, केळी, डाळींब, मका उत्पादनाचे मोठे प्रमाण असून व्यापारी शेतकर्‍यांच्या बांधावर येऊन मालाची खरेदी करतात मात्र पैसे न देता फसवणुक करतात. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान होते.

यामुळे अशा व्यापार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्याचे प्रभारी अधिक्षक संदिप घुगे, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन सर्व पोलीस ठाण्यांना फसवणुक झालेल्या शेतकर्‍यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार वणी, दिंडोरी, लासलगाव, सिन्नर, सटाणा, व नाशिक या पोलीस ठाण्यांमध्ये 14 व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोरी येथील गुन्ह्यात व्यापार्‍याने 3 शेतकर्‍यांना साडेसात लाख रूपयांची रक्कम परत केली आहे. तर उर्वरीत 13 व्यापार्‍यांना 10 दिवसात सदर रक्कम परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले आहे. याबरोबरच प्रभारी अधीक्षक संदिप घुगे यांनी ज्या ज्या शेतकर्‍यांची फसवणुक झाली आहे. अशांनी जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

असे गुन्हे

वणी - 4

पिंपळगाव - 2

दिंडोरी - 4

लासलगाव - 1

सिन्नर - 1

सटाणा - 1

नाशिक - 1

एकुण - 14

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com