देवळा | तालुका विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील झिरेपिंपळ येथे मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बारा जनावरांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या परिसरातील हिंस्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ शिवारात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अशोक शंकर आहेर रा. झिरेपिंपळ यांचे नऊ कोकरू, दीपक शिवराम शेळके रा. झिरेपिंपळ यांची एक शेळी, आशाबाई निंबा आहेर रा. सरस्वतीवाडी यांची एक शेळी व एक बोकड अशा एकूण १२ जनावरांवर जंगली हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने यात ती जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनपाल शांताराम आहेर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू झाम्बरे यांनी भेट देऊन पंचनामा केला असून जनावरांच्या जखमा पाहून हा हल्ला लांडग्यांनी केला असल्याचे वनरक्षक शांताराम आहेर यांनी सांगितले.

यात पशुपालकांचे जवळपास साठ हजार रुपयांचे नुकसान झाले असून या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांची भरपाई मिळावी अशी मागणी या पशुपालकांनी केली आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाच्या बागा असून, परिसरात असलेल्या बिबट्या, लांडगे यांच्या दहशतीमुळे मजूरवर्ग व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात यापूर्वी देखील हिंस्र वन्यप्राण्यांचा हल्ल्यात अनेक जनावरे ठार झाली असल्याने वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन या परिसरातील बिबट्या, लांडगे यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी अतुल आहेर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.