चिंताजनक : सहा वर्षात ११४ बिबट्यांचा मृत्यू

राखीव अधिवास नसल्याने उद्भवतोय प्रश्‍न
चिंताजनक : सहा वर्षात ११४ बिबट्यांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्याने बिबट्याचा (Leopards) संचार गाव आणि शहराकडे वाढ्त आहे, परिणामी मानव व बिबट्याच्या संघर्षाच्या घटना घडत आहेत. मागील सहा वर्षांत नाशिक जिल्ह्यात (Nashik district) तब्बल ११४ बिबट्यांचा वाहनांच्या धड्केत, विहरीत पडून, आजारी पडून व वर्चस्व गाजविण्यासाठी होणारा बिबट्यांमधला संघर्ष आदी विविध कारणांनी मृत्यू (Death) झाल्याच्या घटना घडल्या आहेत...

नाशिक शहर व जिल्ह्यातील विशिष्ट भागात बिबट्या (Leopards) दिसणे नविन राहिले नसून रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे नाशिकची ओळ्ख बिबट्यांचे शहर असेही काहीजण करु लागले आहेत.

बिबट्याला मुळ अधिवास क्षेत्र नसल्याने सावजच्या शोधात तो अनेकदा गावाच्या तटबंदी ओलांडत असल्याचे दिसून आले आहे.

बिबट्याबरोबरच ३८ काळवीटांचा (Blackbuck) व २१ हरणांचा (Deer) गेल्या पाच वर्षात मृत्यू झाला आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी (Wild Life conservation) व त्यांच्या सुरक्षेसाठी (Wild Life Protection) केल्या जाणार्‍या उपाययोजना फोल ठरत आहेत.

नाशिक वनवृतामधील पश्‍चिम व पूर्व वनक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने बिबट्या भक्षांच्या शोधात स्थलांतर करतात. यामुळे अनेकदा रस्ते ओलांडताना, विहिरीत पडून, तलावात पडून बिबट्यासह इतर वन्यजीवांचा मृत्यू होतो आहे.

राखीव वनेक्षत्र (Reserve forest) व वन्यजीवांचा वावर असलेल्या परिसराजवळून राज्य व जिल्हामार्गावरुन रात्रीच्या वेळेस रस्ता ओलड्ताना बिबट्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पाच वर्षांत २४ बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तर १५ तरसांचाही अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

स्वतंत्र गणना नाही

नाशिक जिल्हयात बिबट्यांची संख्या चार ते पाच वर्षांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. उसाच्या शेतात अनेकदा बछडे सापडतात. तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रकार जिल्ह्यात होतच असतात. दरम्यान जिल्ह्यात बिबट्यांची संख्या किती याची एकूण आकडेवारी वनविभागाकडे नाही. केवळ बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी इतर वन्यजीवांसोबत बिबट्यांची गणना होते. मात्र कोरोनामुळे ही गणनादेखील दोन वर्षांपासून झालेलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येबाबत खरी आकडेवारी नसल्याचे चित्र आहे.

ज्या ठिकाणी बिबटयाचा वावर आहे तेथे फलक लावण्यात आले आहेत, अशा मार्गांवर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. काळजी घेउन वाहन चालविल्यास बिबट्याचा जीव वाचू शकतो. अनेक ठिकाणी शेतातील विहिरींना कठडे नसल्याने बिबट्याचा विहरीत पडून मृत्यू होतो. शेतकर्‍यांना विनंती करुन विहिरींना कठडे बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्‍चिम वनक्षेत्र, नाशिक.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com