हरसूल । Harsul

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात महत्वपूर्ण ठरलेल्या जलपरिषदेच्या 'मिशन जलपरिषद १०१ वनराई बंधारे मोहीम पूर्ण झाली असून अजूनही ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हाती घेतलेल्या मोहिमेस ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने तालुक्यांच्या कानाकोपऱ्यात ही मोहीम उभी राहिल्याने गाव - पाड्यात वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.हरसूल येथील जलपरिषदेच्या बैठकीला (दि.२२ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण होत असल्याने ही मोहीम महत्वकांक्षी मानली जात आहे.

'ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी फक्त एक धाव पाण्यासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन हरसूल येथील जलपरिषदेने 'मिशन जलपरिषद १०१ वनराई बंधारा मोहीम' हाती घेतली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेवगापाडा येथे ग्रामस्थ तसेच जलपरिषद मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली मिशन जलपरिषद मोहीम त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात वनराई बंधाऱ्याच्या रुपात ग्रामस्थांच्या श्रमदानाने पोहचली.

ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, तरुण मित्र, शिक्षक, वनविभाग, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक पदाधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानासाठी सहभाग नोंदविला आहे.

पाण्याचे महत्व आणि भेडसावणारी पाणीटंचाई ही केवळ गरज नसून जीवनदायिनी आहे. यामुळे पाणी हे जीवन आहे.पाण्यासाठी केवळ येथील ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करावी लागते ही मोठी शोकांतिका आहे.सुजलाम सुफलाम भागांसाठी केवळ पाणी हेच मुख्य घटक आहे.

पाणी असेल तर शेती, रोजगार, दळणवळण आणि मानवी घटकांच्या मुख्यतः कलाटणी देणारे साधन आहे. या तालुक्यातील भागांत मुबलक पाऊस पडत असूनही उन्हाळयात ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. पाण्यासाठी मैल अन मैल आणि काही भागांत डोळ्यात तेल घालून हंडाभर पाण्यासाठी जागती रात्र काढावी लागत आहे.

ही दाहकता डोळ्यासमोर ठेवून जलपरिषदेचे सदस्य आणि मिशन जलपरिषद जनक पोपट महाले,अनिल बोरसे यांनी डोळ्यासमोर ठेवून अतिदुर्गम आणि उन्हाळ्यात टंचाईग्रस्त शेवगापाडा येथील पाड्यातून ग्रामस्थांच्या श्रमदानातून मिशन जलपरिषद १०१ वनराई बंधारा मोहीम हाती घेतली.

आजमितीस ही मोहीम १०१ वनराई बंधारे ग्रामस्थांच्या श्रमदानातून बांधून पूर्ण झाली असून अजूनही ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बधण्यात येत आहे. जवळपास तालुक्यात १७८ वनराई बंधारे बांधण्यात आले आहे.वनराई बंधाऱ्याच्या श्रमदानासाठी सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांचे जलपरिषदेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

पाच पेक्षा अधिक वनराई बंधारे बांधणारी गावे

पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील आमलोण, जातेगाव, हातलोंढी, काकडदरी, तांदळाचीबारी, गोलदरी, सावरपाडा ,मुरूमटी, खरवळ, शेवगापाडा, आडगाव, हातरूंडी, चिंचवड, पिपळपाडा, ओझरखेड, जुनोठी, मोहदांड, चोळमुख, कहांडचोंड, बेडसे, कढवईपाडा, कुळवंडी, मोखनळ, बोरवण आदी गावांनी पाच पेक्षा अधिक वनराई बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांच्या श्रमदानातून योगदान दिले आहे.

रिकाम्या गोणी देणारे दाते

सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सौ.मनीषा महाले, हरसूल हिंदुस्थान पेट्रोलियमचे संजय गायकवाड, सरपंच सौ.सविता गावीत, उपसरपंच नितीन देवरगावकर, हिरामण इंगळे, आपली आपुलकीचे खडेराव डावरे, निलेश मोरे, अवनित बग्गा, तुषार वाघमारे.

पाण्याचे महत्व ग्रामस्थांना पटल्याने या मोहिमेत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानासाठी सहभाग नोंदविला.जवळपास हजारोंच्या संख्येत श्रमदानासाठी ग्रामस्थ, अनेक विभाग एकत्र आल्याने मिशन जलपरिषद १०१ वनराई बंधारे मोहीम पूर्ण करण्यात यशस्वी झाली. अजूनही काही भागात मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्यातच येत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. पुढील दोन तीन महिन्यासाठी हे बंधारे उपयुक्त ठरणारे असल्याने पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात होणार आहे.जलपरिषदेचा हा संकल्प ग्रामस्थांच्या पुढाकाराने कायमचा ऋणी राहील.

-पोपट महाले, जलपरिषद सदस्य