मार्चच्या गणनेत १० हजार पक्ष्यांची नोंद

मार्चच्या गणनेत १० हजार पक्ष्यांची नोंद

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात मार्च-२०२१ या महिन्याची तसेच या हंगामातील सातवी मासिक पक्षी गणना पार पडली.

या पक्षी प्रगणनेत ५७ प्रजातींचे ९ हजार २८५ विविध पाणपक्षी, तर १ हजार ६२ झाडांवरील व गवताळ पक्षी दिसून आले. मार्चअखेरीस १० हजार ३४७ पक्ष्यांची नोंद नांदूरमध्यमेश्वरमध्ये करण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मधमेश्वर गोदावरी पात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव आदी सात केंद्रांवर पक्षी निरीक्षण करण्यात आले.

या प्रगणेत मार्श हॅरियर, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बील डक, चमचा शेकाट्या, पाकोळी पक्षी आदींचे दर्शन झाले आहे. तसेच काही ठिकाणी चित्रबलाकची ही घरटी आढळून आली. गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.

सहायक वनसंरक्षक भरत शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रगणना झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणनेसाठी वनाधिकारी, कर्मचारी स्थानिक गाइड, पक्षिमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक आदींना मास्क बंधनकारक करण्यात आले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

यावेळी वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, पक्षिमित्र दत्ता उगावकर, प्रा. आनंद बोरा, रोहित मोगल, शरद चांदोरे, गाइड अमोल दराडे, शंकर लोखंडे, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com