100 गाव-पाड्यांना तीव्र पाणीटंचाई

100 गाव-पाड्यांना तीव्र पाणीटंचाई

पेठ । प्रतिनिधी Peth

पेठ तालुक्यातील पाणीटंचाई तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहे. तसतशी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे 100 गाव-पाड्यांना पाणी टंचाई झळा बसत आहेत.

सध्या स्थितीत शंभरीच्या वरील गावांना, पाड्यांना वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहे. कित्येक गाव, वाड्या, पाड्यांना ऐन रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी नदी, नाले, डोंगर दर्‍या खोर्‍यातून पायपीट करत रात्री अपरात्री हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. पेठ तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या असून ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याच विहिरीनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

गावे व पाडे वाड्यांना तीव्र पाणी टंचाई भासत असल्याने सहा टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील छोटी-मोठी अशी नऊ धरणे आहे. मात्र त्यातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. अजून तालुकावासियांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता जाणवू लागली आहे.

शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, म्हशी आदी जनावरांची सध्याची बिकट अवस्था पाहून वाटते. ओसाड पडलेल्या शेतजमिनी, कोरडे पडलेले जलस्त्रोत व रानावनातील चारा नष्ट झाला आहे. त्यामुळे रानोमाळ सैरावैर भटकुन चरणार्‍या जनावरांना चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

उन्हाच्या कडाक्यात जमीन भाजुन निघत असल्याने पिकांचे उरले सुरले अवशेष नष्ट झाले आहेत. त्यामुळे जनावरे रानावनात चारायला घेऊन जाणार्‍या राखोळीदारांना चार्‍याच्या शोधात पायपीट करावी लागत असल्याचे बोलले जात आहे. इतके दूर रानोमाळ भटकंती करूनही नदी, नाले, पाझर तलाव यांनाही पाणी नाही. शेतशिवारात चारा मिळत नसल्याने घरी साठवून ठेवलेला कडबा कुट्टी वाळलेले गवत जनावरांची भूक भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com