'बॉश'कडून बिटकोत 100 खाटांची व्यवस्था

सिव्हिल टेककडून स्ट्रक्चरल, फायर व इलेक्ट्रीक ऑडीट
'बॉश'कडून बिटकोत 100 खाटांची व्यवस्था

नाशिक । प्रतिनिधी

सातपूर औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपनी असलेल्या बॉश कंपनीने त्यांच्या सी.एस.आर फंडातून बिटको हॉस्पिटल येथे सुमारे शंभर बेडची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचललेली आहे. यामुळे बिटको रुग्णालयात नवीन 100 खाटांची भर पडणार आहे. तसेच मनपाच्या करोना केअर सेंटरचे ऑडिट नाममात्र शुल्कात करून देण्याची जबाबदारी शहरातील सिव्हिल टेक या कंपनीने घेतली असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली...

शहरातील करोना संसर्गाचे रुप पाहता आरोग्य सुविधा कमी पडत असतांना आता सेवा - सुविधा पुरविण्यासाठी आता व्यक्ती, संस्था, कंपन्या पुढे येऊ लागल्या आहे. तसेच करोना सारख्या महामारीच्या भयानक संकटात विविध सामाजिक संस्था महानगरपालिकेस सहकार्य करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेले ठक्कर डोम, स्व.मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल,राजे संभाजी स्टेडियम यासारख्या शहरातील करोना कक्षांचे शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हे ऑडिट करण्यात येणार आहे. मनपाच्या स्ट्रक्चरल ऑडिट पॅनल वरील मे.सिव्हिल टेक या कंपनीने मनपाच्या सर्व कोविड कक्षांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाममात्र शुल्क 1/- रुपया दराने काम करून देण्यास सहमती दर्शवली असून यासंदर्भात या कंपनीने मनपास पत्र दिलेले आहे.

त्या अनुषंगाने सदरचे काम करण्यास महापालिकेच्या वतीने त्यांना मान्यता देण्यात आली असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

बॉश कंपनीने त्यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी(सीएसआर फंड)तून नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल मध्ये शंभर बेडचे हॉस्पिटल (कोरोना कक्ष) उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून हे शंभर बेडचे हॉस्पिटल (कोरोना कक्ष) उभारण्याच्या दृष्टीने दोन ते तीन दिवसात काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

यासंदर्भातील पत्र बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत चव्हाण व कंपनीच्या सी. एस.आर. फंड अधिकारी राहुल आहेर यांनी समक्ष देऊन चर्चा केली असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com