जेलरोडचे शंभर बेडचे करोना सेंटर बंद

पक्षांतर्गत गटबाजीचा फटका
जेलरोडचे शंभर बेडचे करोना सेंटर बंद

नाशिकरोड । Nashik

येथील प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी स्वखर्चाने जेलरोड येथे जुना सायखेडा रोडवरील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात शंभर बेडचे करोना सेंटर उभारले होते. मात्र पक्षातील काही नगरसेवक व नेत्यांच्या अंतर्गत विरोधामुळे तसेच आरोग्य कर्मचारी न मिळाल्याने नाईलाजास्तव संगमनेरे यांना सदरचे करोना सेंटर बंद करावे लागले.

नगरसेवक विशाल संगमनेरे हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्याचप्रमाणे गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरे यांनी सानप यांचा उघडपणे प्रचार केला होता.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडमध्ये भाजपच्या नगरसेवकांत दोन गट पडले आहेत. याचाच परिणाम संगमनेरे यांनी उभ्या केलेल्या करोना सेंटरला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध करून आरोग्य कर्मचारी मिळू नये म्हणून फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे.

नाशिकरोडसह जेलरोड परिसरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. फक्त जेलरोडच्या करोना सेंटरवर टेस्टिंगसाठी येणार्‍यांची संख्या दिवसाला शंभर आहे. बिटको रुग्णालयातही रुग्णांना बेड शिल्लक नाहीत. रुग्णांना उपचारासाठी भटकावे लागत असून प्राण गमवावे लागत आहेत. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन नगरसेवक संगमनेरे यांनी राजराजेश्वरी मंगल कार्यालयात शंभर बेडचे करोना सेंटर सुरु केले.

त्यात महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारले होते. स्वागत कक्षही उभारला होता. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांबरोबरच विलगीकरण करण्यास सांगितलेल्या रुग्णांचीही येथे व्यवस्था करण्यात आली होती. बिटको करोना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनीही येथे पाहणी करुन सकारात्मक अहवाल दिला होता.

वैद्यकीय स्टाफ मिळावा यासाठी नगरसेवक संगमनेरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतिष कुलकर्णी, महापालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त मनोज घोडे पाटील, आरोग्य अधिकारीसह अनेक मान्यवरांकडे पाठपुरावा करुन पत्रव्यवहार केला. मात्र महिनाभर प्रयत्न करुनही आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही.

त्यामुळे नगरसेवक संगमनेरे यांनी या सेंटरसाठी भाड्याने आणलेले पलंग, गाद्या, उशा आदी साहित्य परत केले. या खर्चाबरोबरच लाईट बील, कार्यालयाचे भाडे त्यांना नाहक भरावे लागले. लाखो रुपये खर्च करुनही सेंटर कार्यरत न झाल्यामुळे त्यांनी प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

हे सेंटर येथे कार्यरत होऊ नये यासाठी स्वपक्षीयातील काहींनी विरोध केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. करोना रुग्णांना सहाय्य करण्यास, त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आपण आजही कटीबध्द आहोत असे त्यांनी नमूद करतानाच प्रशासन व सरकारकडून अपेक्षित सहकार्य व मदत मिळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

प्रभाग 18 मध्ये तीन नगरसेवक भाजपचे आहेत. त्यांचे अंतर्गत कलह असल्याने त्याचा फटका नगरसेवक संगमनेरेंनी सुरु केलेल्या शंभर खाटांच्या करोना सेंटरला बसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com