७० टक्के रुग्ण नियंत्रण कक्षातच ठणठणीत
नाशिक

७० टक्के रुग्ण नियंत्रण कक्षातच ठणठणीत

जिल्हाधिकारी : रुग्णालयात पुरेशा खाटा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर व जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा हा साडेपाच हजार इतका दिसत असला तरी तीन हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ७० टक्के रुग्ण हे करोना नियंत्रण कक्षातच ठणठणीत झाले असून त्यांच्यावर नॉर्मल उपचार करण्यात आले. तर ११ रुग्ण हे व्हेंटिलिटरवर असून ३१ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहे. ही परिस्थिती बघता रुग्णसंख्या वाढत असली तरी शहर व जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

लक्षणे असलेल्या मात्र गंभीर नसलेलेल्यारुग्णांवर कोविड रुग्णालयांमध्ये होणार्‍या उपचाराबाबतचे ऑडिट केले जात आहे. जिल्ह्यात बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी केवळ ११ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर, तर ३१ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग हा ठराविक काळापर्यंत वाढतच राहणार आहे. कोविड रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांचे ऑडिट करून रुग्णाला खरोखरीच दाखल करून घेण्याची आवश्यकता आहे का, हे पडताळून पाहिले जाणार आहे. आश्यकता नसतानाही कोविड रुग्णांच्या खाटा अडविल्या असतील तर संबंधितांना त्याची समज दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

कोविड केअर सेंटरमध्येच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने असे रुग्ण सेंटरमध्येही बरे होऊ शकतात. त्यामुळे खरोखरीच रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर कोविड उपचाराची आवश्यकता कितपत आहे, याची चाचपणी केली जाईल. करोनाबाधित रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या मार्गदर्शक सूचना आता केंद्राकडून प्राप्त झालेल्या आहेत. ज्या रुग्णांमध्ये लक्षणेे आहेत, परंतु ते सौम्य आहेत अशा रुग्णांवर घरीच उपचार करणेे शक्य असल्याच्या नव्या मार्गदर्शक सूचना आहेत. ज्यांच्या घरात अशा रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकेल त्यांच्यावर घरीच उपचार होऊ शकतात. अशा रुग्णांना आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयातही उपचार होऊ शकतात.

रुग्णांच्या मनोरंजन आणि समुपदेशनासाठी टीव्ही संच मंजूर करण्यात आले आहेत. नातेवाईकांना रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी आठ मोबाईल फोनचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com