सिन्नर : संत हरीबाबा पाणी वापर संस्थेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन

जलसंधारणच्या कामांमूळे 2 वर्षांपूर्वी झाली होती संस्था स्थापन
सिन्नर : संत हरीबाबा पाणी वापर संस्थेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन
Water use organizationKirtangali

सिन्नर । प्रतिनिधी

किर्तांगळी येथील श्री संत हरीबाबा पाणी वापर संस्थेच्या कार्यालयाचा युवा मित्रचे कार्यकारी अध्यक्ष सुनिल पोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

युवा मित्रने मागील 2 वर्षांपूर्वी गावात केलेल्या जलसंधारणच्या कामांमूळे गाव व परिसरात पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातून उत्साह वाढलेल्या शेतकऱ्यांनी सरपंच दगु चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली व युवा मित्रच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षांपूर्वी गावात पाणी वापर संस्था स्थापन केली होती. संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहेत.

संस्थेचा वाढता कारभार लक्षात घेता संचालकांनी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला व त्यामार्फत गावातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी बनवून पाण्याबरोबरच कृषि निविष्ठा तसेच उत्पादीत शेतमालाला विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कार्यालयासमोर वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पोटे यांनी शेतमाल विक्री, अटल भूजल योजना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष दगु चव्हाणके यांनी संस्थेच्या कामाचा अहवाल मांडला. उपाध्यक्ष गोरख चव्हाणके यांनी संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिव नानासाहेब चव्हाणके यांनी संस्थेचे सभासदत्व घेतल्यानंतर होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली.

अजित भोर यांनी संस्थेच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन करीत विविध संस्थानी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नितीन अढांगळे, ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाणके, ज्ञानेश्र्वर चव्हाणके, प्रभाकर चव्हाणके, रावसाहेब चव्हाणके, जेष्ठ नेते संपततात्या चव्हाणके, दशरथ गोसावी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com